Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोवंडीत दहा मोटारसायकली पेटविल्या

By admin | Updated: November 26, 2015 02:18 IST

नागरिकांनी आपल्या घराच्या दारात लावलेल्या सहा मोटारसायकली अज्ञातांनी ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटविण्याची घटना मंगळवारी रात्री गोवंडीतील निंबोनी बाग परिसरात घडली.

मुंबई : नागरिकांनी आपल्या घराच्या दारात लावलेल्या सहा मोटारसायकली अज्ञातांनी ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटविण्याची घटना मंगळवारी रात्री गोवंडीतील निंबोनी बाग परिसरात घडली. यामध्ये मोटारसायकलीचे पूर्ण नुकसान झाले असून घराच्या लाइट मीटरचेही नुकसान झाले. गाड्या पेटविण्याची गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना असून अद्याप हे कृत्य करणाऱ्याचा थांगपत्ता पोलिसांना लावता आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीबरोबरच संताप व्यक्त होत आहे. नशेबाज तरुणांकडून हे कृत्य केले जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. रविवारी मध्यरात्री चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्गावरील नागवाडी परिसरात अज्ञात इसमांनी घरासमोर उभ्या असलेल्या चार दुचाकी पेटविल्या. याबाबत दुचाकी मालकांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही घटना ताजी असतानाच गोवंडीच्या निंबोनी बाग परिसरातदेखील अशाच प्रकारे सहा दुचाकी जाळण्यात आल्या. मंगळवारी रात्री २ च्या सुमारास काही अज्ञात इसम या ठिकाणी आले. त्यांनी येथील ज्या घरासमोर दुचाकी उभ्या होत्या त्यांना आग लावून पळ काढला. रहिवाशांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ काही गाड्यांची आग विझवली, तर काही गाड्यांना मोठी आग लागल्याने रहिवाशांनी अग्निशामक दल आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. एका ठिकाणी तर रहिवाशांचे एकत्र लाइटचे मीटर असलेल्या बॉक्सलादेखील आग लावण्यात आली होती. मात्र रहिवाशांनी वेळीच ही आग विझवल्याने मोठी हानी टळल्याचे रहिवाशांनी सांगितले. या घटनेबाबत दुचाकी चालकांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)