Join us  

दृश्यकलेचे वैभव उलगडणार, मराठीनंतर आता इंग्रजी भाषेतून कोश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 1:30 AM

मुंबई : राज्यातील कला क्षेत्राच्या वैभवात भर घालणारा आणि वर्षानुवर्षांची दृश्यकलेची परंपरा उलगडणारा ‘व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’ हा ग्रंथ ...

मुंबई : राज्यातील कला क्षेत्राच्या वैभवात भर घालणारा आणि वर्षानुवर्षांची दृश्यकलेची परंपरा उलगडणारा ‘व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’ हा ग्रंथ लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या पुढाकाराने हिंदुस्तान प्रकाशन समूह संस्थेच्या वतीने या ग्रंथाचे २ मार्च रोजी कलेचे दैवत मानणाऱ्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स संस्थेत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात येईल.

‘व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’ या ग्रंथात १८ शतकापासून ते २१व्या शतकापर्यंतचा संपूर्ण कालखंडातील कलाकारांचा प्रवास विशद करण्यात आला आहे. या ग्रंथाचे संपादन ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर आणि दीपक घारे यांनी केले. ग्रंथासाठी पुंडोले आर्ट कलादालन या संस्थेने सहकार्य केले.

सुपर्णा कुलकर्णी, सुधीर पटवर्धन, दिलीप रानडे, दाडिबा पुंडोले, फिरोजा गोदरेज आणि खोर्शीद पुंडोले या समितीच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथाचे संपादन करण्यात आले.  या ग्रंथात सुमारे ३०७ कलाकार आणि चार प्रमुख कला संस्थांविषयी लेखनाचा समावेश असून प्राचीन काळ ते आधुनिक काळापर्यंतची २२७ चित्रांचा समावेश आहे. तर ८२८ कृष्णधवल चित्रांसह १ हजार १८० अन्य चित्र आहेत.

याविषयी, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी सांगितले, २०१३ मध्ये मराठीत हा कोश प्रकाशित केला. त्याला सर्व स्तरातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर इंग्रजी भाषेतील कोशनिर्मितीसाठी आर्थिक भार उचलण्यासाठी अडचणी भासू लागल्या. त्यावेळेस खरे तर शासकीय पातळीवर जबाबदारी घेणे अपेक्षित होते, मात्र यंत्रणांकडून पदरी निराशा आली. त्यानंतर २०१४ मध्ये हिंदुस्थान प्रकाशन संस्था आणि पुंडोले कलादालन यांच्या साहाय्याने हा प्रकल्प हाती घेण्यात आला, असे ते म्हणाले. 

मुंबईत संग्रहालय हवे, कलेचे वैभव जपा

दृश्यकलेबाबत महाराष्ट्र खूप मागासलेला असून गोवा, मध्य प्रदेश, हरियाणा यांसारखी राज्ये दृश्यकलेवर अधिक खर्च करतात ही दुर्दैवाची बाब आहे. राज्यात असलेल्या कलाकृतींमध्ये जतनासंदर्भात उदासीनता आहे. मुंबईत राज्याच्या कलेचे किंवा कलावंतांचे संग्रहालय नाही ही खेदाची बाब आहे. परदेशात सिटी म्युझिअम असतात. आपल्याकडे किमान राज्यस्तरावरचे संग्रहालय असायला हवे. या कोशामधून संग्रहालयासाठी प्रचंड साहित्य उपलब्ध होईल, असे बहुलकर यांनी सांगितले.

कलाकारांची माहिती जमा करण्याचे आव्हान

ग्रंथासाठी कलाकारांची माहिती शोधत असताना अनेक आव्हाने समोर होती. त्यात जी.एच. हजारनीस यांची माहिती गोळा करताना वृत्तपत्रातील जाहिरातीतून मदत घेतली.  त्यानंतर त्यांचा वृद्ध मुलगा त्यांची सर्व माहिती घेऊन भेटायला आला होता, अशी आठवण बहुलकर यांनी सांगितली. त्यानंतर शिल्पकार मडिगलेकर यांच्याविषयी माहिती घेताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मराठवाड्यात जाऊन स्थायिक व्हा’, असे सांगितल्याचे समजले.  त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीचा शोध घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्या वेळेस स्वतः आंबेडकर समोर बसले असताना त्यांचे शिल्प बनविताना मडिगलेकर यांचे दुर्मीळ छायाचित्र हाती लागल्याचे बहुलकर यांनी नमूद केले. यावेळी, बहुलकर यांनी कलाक्षेत्रातील दस्ताऐवजीकरणावर भर द्यायला हवा, ही बाब अधोरेखित केली.

टॅग्स :मराठी