Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या असिस्टंट पोस्ट मास्तरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:06 IST

मुंबई : असिस्टंट पोस्ट मास्तर वंदना पै या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या अडतीस वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली ...

मुंबई : असिस्टंट पोस्ट मास्तर वंदना पै या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या अडतीस वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाला योग्य तो वेळ द्यावाच, त्याचबरोबर वंदना पै यांनी आपल्यामधील कवी, लेखक जागृत ठेवता ठेवता नवसाहित्याची निर्मिती करावी आणि पोस्ट कर्मचारी -अधिकारी यांच्याबरोबरच समाजाचेही प्रबोधन करावे, अशा शब्दांत राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

वंदना पै यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. याबद्दल त्यांचा बोरिवली पूर्व पोस्ट कार्यालयात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या कारकिर्दीत बोरिवली पूर्व विभागात अनेक शिबिरांचे आयोजन करून जनतेसाठी उपयोगी असणाऱ्या अनेक बचत योजना सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहोचविल्या. यात खास मुलींसाठी असणारी सुकन्या योजना, सगळ्यात जास्त व्याजदर असणारी पीपीएफ योजना, पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना तसेच अनेक आधार कॅम्प यांचा समावेश होता. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पेन्शनधारकांना घरपोच पेन्शन नेऊन देण्याची व्यवस्था केली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या ऑफिसला अनेकदा उत्कृष्ट कार्याबद्दल पारितोषिके मिळवून दिली.

त्यांच्या या गौरव समारंभास टपाल कामगार युनियनचे या विभागाचे माजी सेक्रेटरी सी. ए. राजपूत, युनियनचे राष्ट्रीय स्तरावरील नेते विजय आयरे, कामगार नेते दिलीप कुडतरकर आणि आसपासच्या अनेक टपाल कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान या ऑफिसमधील असिस्टंट पोस्ट मास्तर प्रिया कारकल यांनी भूषविले.