Join us  

जागतिक हवाई मालवाहतुकीमध्ये मे महिन्यात २० टक्के घट 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 1:43 PM

कोविड 19 चा प्रकोप जगभरात वाढल्याने जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन व हवाई वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले.

 

मुंबई : कोविड 19 चा प्रकोप जगभरात वाढल्याने जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन व हवाई वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले. हवाई मालवाहतुकीला परवानगी देण्यात आलेली असली तरी जागतिक पातळीवरील अनेक व्यवहार,  उद्योग बंद असल्याचा फटका हवाई मालवाहतुकीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात कार्गो टन किलोमिटर्स (सीटीके)  मध्ये तब्बल 20.3% घट नोंदवण्यात आली आहे.  त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, एप्रिलच्या तुलनेत हवाई मालवाहतुकीमध्ये काहीशी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात ही घट गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत 25.6% इतकी होती. 

जगात काही ठिकाणी उद्योगधंदे व व्यवसाय काही प्रमाणात सुरु झाल्याने आयात, निर्यातीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे हवाई मालवाहतुकीला थोडीशी मागणी येऊ लागली आहे. जागतिक हवाई मालवाहतुकीमधील घट होण्याचेे सातत्य सुरु असून काही प्रमाणात ही घट कमी होऊ लागली आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सामग्रीच्या आयात निर्यातीचे प्रमाण हवाई मालवाहतुकीमध्ये लक्षणीय आहे. आता इतर उद्योग सुरु होऊ लागल्याने आयात व निर्यातीचे प्रमाण वाढु लागले आहे.  मात्र कोविड 19 मुळे मधील काळात कामकाज पूर्णत: ठप्प झाल्याने त्याचा या क्षेत्राला बसलेला आर्थिक फटका अत्यंत मोठा असल्याने हा फरक भरुन निघण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. हवाई वाहतूक व हवाई मालवाहतूक क्षेत्रासाठी हे वर्ष अत्यंत निराशाजनक ठरले असून नजिकच्या भविष्यकाळात या दोन्ही क्षेत्रातील कामगिरी पूर्वीप्रमाणे होण्यासाठी अत्यंत कठोर व सुसुत्रित उपायांची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविमानतळ