Join us

पहिली प्रवेश पाचव्या वर्षीच द्या

By admin | Updated: January 23, 2015 02:04 IST

राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची वयोमर्यादा पाच वर्षांऐवजी सहा वर्षे करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई मुख्याध्यापक संघटनेने आक्षेप घेतला आहे.

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची वयोमर्यादा पाच वर्षांऐवजी सहा वर्षे करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई मुख्याध्यापक संघटनेने आक्षेप घेतला आहे. पहिली इयत्तेतील प्रवेशाची वयोमर्यादा पाच वर्षेच असावी, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात येणार असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत रेड्डीज यांनी सांगितले.पहिली इयत्तेत विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी सध्या वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ््या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जातात. तसेच पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट नसल्याने शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित केले आहे. त्यानुसार प्ले ग्रूप / नर्सरीत प्रवेशासाठी साडे तीन वर्ष पूर्ण केलेल्या आणि पहिली इयत्तेच्या प्रवेशासाठी सहा वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना अध्यादेशाद्वारे देण्यात आल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे. नवीन निर्णयानुसार पहिलीच्या प्रवेशासाठी ३१ जुलै रोजी पाच वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येईल. तर २0१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी ५ वर्षे ४ महिने पूर्ण झालेल्या, २0१७-१८ मध्ये ५ वर्ष ८ महिने पूर्ण झालेल्या आणि २0१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून सहा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)विरोधाचे कारणसध्या विद्यार्थ्याचे १०वीपर्यंतचे शिक्षण १५व्या वर्षी पूर्ण होते. हा निर्णय लागू झाल्यानंतर विद्यार्थी एक वर्ष उशिरा दहावी होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार असल्याने याला मुंबई मुख्याध्यापक संघटनेने आक्षेप घेतला आहे. ‘शासनाने पारित केलेला आदेश हा आरटीई कायद्यानुसार ६ ते १४ या वयोगटाच्या आधारे घेतला आहे. मात्र, बदलते तंत्रज्ञान, परिस्थिती आणि बालकांचा होणारा विकास पाहता ५व्या वर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश हे धोरण योग्य असल्याचे संघटनेचे मत आहे.