Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या दर्शनासाठी टोकन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावलीही जारी करण्यात आली आहे. भक्तांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावलीही जारी करण्यात आली आहे. भक्तांना मंडळाला भेट द्यायची असेल, गणपतीचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी टोकन यंत्रणेची व्यवस्था करावी, जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही, असे पोलिसांकडून नमूद करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

राज्यात सुरू झालेल्या सणांमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार, प्रशासन आणि पोलीसही अलर्ट आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणे अपेक्षित आहे. मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची योजना आखली आहे.

पोलीस सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन सर्वांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

गणेशोत्सवानिमित्त मुंबईत पोलिसांची एकूण १३ विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक एपीआय, दोन पीएसआय अशा ११ कॉन्स्टेबलचा समावेश असेल. मुंबईत एकूण १३ झोन असून, प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल. कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही, यावर या पथकांचे लक्ष राहणार आहे.

मुंबई पोलिसांनी भक्तांना ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन गणेशोत्सव मंडळांना केले आहे. याशिवाय जर भक्तांना मंडळाला भेट द्यायची असेल आणि गणपतीचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी टोकन यंत्रणेची व्यवस्था करावी जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही, असेही पोलिसांकडून नमूद करण्यात आले आहे.