Join us

‘त्यांना’ हुतात्मा दर्जा द्यावा

By admin | Updated: May 19, 2015 01:59 IST

वीरमरण आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ‘हुतात्मा’ असा दर्जा देण्यात यावा आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात यावा,

मुंबई : वीरमरण आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ‘हुतात्मा’ असा दर्जा देण्यात यावा आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात यावा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. काळबादेवीमधल्या गोकूळ हाऊस इमारतीच्या दुर्घटनेदरम्यान मृत पावलेले अग्निशमन दलाचे जवान सुधीर अमीन यांच्या कुटुंबीयांची चेंबूर येथील निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भेट घेतली, या वेळी ते बोलत होते.महापौर स्नेहल आंबेकर आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी रविवारी अमीन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शिवाय सांत्वन करीत मदतही देऊ केली. परंतु यावर अमीन यांच्या पत्नी शर्मिला यांनी आमच्या मागण्यांचा महापालिकेकडून ठोस पाठपुरावा होणार नाही, तोवर आम्ही कोणत्याही प्रकाराची भरपाई स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले. याचवेळी अमीन कुटुंबीयांना देण्यात आलेल्या धनादेशात तांत्रिक चुका असल्याने तो सुधारित देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले होते. उद्धव ठाकरे यांनी तोवर अमीन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. शिवाय त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही दिले. दरम्यान, महापालिका आता याप्रकरणी विशेष सभा घेणार आहे. आणि या सभेत मंजूर झालेला प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविणार आहे. (प्रतिनिधी)