Join us

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरा डोस लवकर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:06 IST

मुंबई ग्राहक पंचायतीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा डोस लवकर द्या, अशी मागणी ...

मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा डोस लवकर द्या, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्राधान्याने कोविड लस देण्याची व्यवस्था राज्य शासनाने करावी, या मुंबई ग्राहक पंचायतीच्या विनंतीला प्रतिसाद देऊन मुंबईतील हजारो विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय महापालिका आयुक्तांनी व राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. ‘लोकमत’ने मुंबई ग्राहक पंचायतीच्या सदर मागणीचे वृत्त १० मे रोजी दिले होते. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, कोविशिल्डची दुसरी लस ८४ दिवसांनी, या नियमानुसार या विद्यार्थ्यांचा दुसरा डोस ऑगस्टअखेरीस येणार असून, हे सोयीचे नाही. यातील बहुतांश विद्यार्थी ऑगस्टच्या सुरुवातीलाच परदेशी जातील. त्यामुळे त्यांच्यासाठी ८४ दिवसांची अट शिथिल करून त्यांच्या प्रवासाच्या तारखेपूर्वी त्यांना दुसरा डोसही मिळेल, अशी व्यवस्था करायला हवी. जुलैअखेरपर्यंत तरी या विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्याची आवश्यकता बघता, ही व्यवस्था लवकरात लवकर करावी, अशी विनंती मुंबई ग्राहक पंचायतीने राज्य शासनाला केली आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ॲड. शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केली.

---- ------------------------------