मुंबई : दलित आदिवासी इतर मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण त्वरित द्यावे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. विविध मागण्यांसाठी आठवले यांच्या नेतृत्वात मंगळवारी आझाद मैदान येथे रिपाइंच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखावेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. तसेच मुस्लीम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण द्यावे. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास रिपाइंचा पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले. राज्यात दलित अत्याचार वाढत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चोतोडा गावात हिवराळे परिवारावर झालेला हल्ला अत्यंत अमानुष होता. या हल्ल्याचा तीव्र निषेध रामदास आठवले यांनी यावेळी केला.
तर दलित अत्याचार झालेल्या गावात बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाऊन चिथावणीखोर जातीवादी भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा निषेध करीत संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.
यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, माजी आमदार सुमंतराव गायकवाड, काकासाहेब खांबळकर, जगदीश गायकवाड, अनिल गांगुर्डे आदी अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.