Join us  

भाजपमधून मुस्लीम समाजाला उमेदवारी द्या, कार्यकर्त्याचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 3:18 AM

सबका साथ-सबका विकास, सबका विश्वास अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पक्षातील मुस्लीम कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी, असा सूर मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांमधून उमटू लागला आहे.

मुंबई : सबका साथ-सबका विकास, सबका विश्वास अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पक्षातील मुस्लीम कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी, असा सूर मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांमधून उमटू लागला आहे. भाजपने अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना राबवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील इच्छुकांचादेखील विधानसभेसाठी उमेदवारी देताना गांभीर्याने विचार करावा व विधानसभेसाठी संधी द्यावी, असा सूर उमटत आहे.महाराष्ट्रात भाजपमध्ये मुस्लीम समाजाचा एकही आमदार सध्या विधानसभेत नाही. त्यामुळे या निवडणुकीत पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. मुस्लीम समाजात पक्षाबाबत चांगले वातावरण तयार होण्यासाठी मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळणे गरजेचे आहे, अशी चर्चा केली जात आहे.याबाबत, पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष व मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हैदर आझम म्हणाले, पक्षाकडे राज्यभरातून काही जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्ष नेतृत्व मुस्लीम समाजाला संधी देण्याबाबत सकारात्मक असून, कार्यक्षम कार्यकर्त्यांना नक्कीच संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.द बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन या १३७ वर्षे जुन्या संघटनेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून उमेदवारी निश्चित करताना ईस्ट इंडियन समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष व्हिवियन डिसोजा यांनी याबाबत गांधी यांना पत्र पाठविले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019