Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल लावण्यासाठी वाढीव मुदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:06 IST

शिक्षक, मुख्याध्यापकांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर शिक्षण मंडळाकडून अंतर्गत मूल्यमापनाची कार्यपद्धती आणि तपशिल ...

शिक्षक, मुख्याध्यापकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर शिक्षण मंडळाकडून अंतर्गत मूल्यमापनाची कार्यपद्धती आणि तपशिल जाहीर करण्यात आला. कार्यपद्धतीबाबत संभ्रमावस्थेत असलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांना मंडळाच्या यू ट्यूब चॅनेलवरून प्रशिक्षणही देण्यात आले. या दरम्यान जे विद्यार्थी वर्षभर ऑनलाईन होते त्यांचे गुणदान करणे शिक्षकांना व शाळेला शक्य आहे. परंतु जे ऑनलाईन नव्हते, त्या विद्यार्थ्यांना ११ ते २० जूनच्या दरम्यान संपर्क करून, त्यांच्या चाचण्या, स्वाध्याय, तोंडी परीक्षा घेऊन निकालाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षक, मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अंतर्गत निकालाचे काम आव्हानात्मक असून, त्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी वाढवून देण्याची मागणी शाळा, मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून होत आहे.

राज्य परीक्षा मंडळाने सांगितल्याप्रमाणे या दहा दिवसांत, गुण संकलित करून निकाल कसा तयार करावा, अशी मोठी संभ्रमावस्था शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये आहे. निकाल बनवणे निश्चितच आमचे काम आहे, परंतु ते करताना अनेक अडचणी आहेत. अनेक विद्यार्थी अजूनही मुंबई किंवा शाळेच्या मूळ ठिकाणी नसल्याने हे काम अवघड होणार असल्याचे शिक्षक सांगतात. शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या या अडचणी सोडवण्याचा विचार शिक्षण विभागाने व राज्य परीक्षा मंडळाने करावा, अशी मागणी शिक्षण अभ्यासक व समुपदेशक शिक्षक अशोक वेताळ यांनी केली.

तर, श्रेणी विषयांच्या विशेषतः सवलतीच्या कला गुणांविषयी अजूनही संभ्रम असून, त्याबद्दल स्पष्टता आणून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली.

* निकालासाठी तरी प्रवासाची परवानगी द्यावी

मूल्यमापन करण्यासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. अनेक शिक्षक हे कर्जत, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा, वसई-विरार, रायगड, पालघर, नवी मुंबईवरून येतात. सध्या लोकल फक्त अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठीच असल्याने शिक्षकांना तिकीट व पास मिळत नाही. त्यामुळे दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांना लोकल प्रवासास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांच्यासोबत मुख्याध्यापकांनी केली.

* शिक्षकांच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह कायम

दहावीच्या निकालाच्या कामासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे शिक्षकांचे तत्काळ लसीकरण होणे आवश्यक होते. परंतु तसे न झाल्याने शिक्षकांकडून संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षकांच्या लसीकरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची शिक्षकांची मागणी आहे.

........................................