कल्याण : विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत अधिका-यांकडून ४० टकके भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची दखल कल्याण डोंबिवली आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी घेतली आहे. यासंदर्भात पुरावे द्या, असे पत्र त्यांनी आरोप करणारे स्थायी समिती सदस्य बाळ हरदास यांना पाठविले आहे. जलवाहिनी आणि भुयारी गटार वाहीन्या टाकण्याच्या कामांचे तब्बल १२ कोटी रूपयांचे प्रस्ताव मान्यतेसाठी नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाने दाखल केले होते. ते चर्चेला येताच सदस्य हरदास यांनी निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. ठराविक कंत्राटदारालाच कामे मिळण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी प्रयत्न करतात,त्यानुसार निविदामधील अटी-शर्ती बनविल्या जातात, या अटी जाचक असल्याने अन्य कंत्राटदाराकडून निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. हरदास यांचे आरोप शहर अभियंता पी.के उगले यांनी फेटाळले असले तरी या आरोपांनी प्रशासनाची कार्यपध्दती संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. दरम्यान या आरोपांची दखल आयुक्त सोनवणे यांनी घेतली असून पुरावे सादर करण्याची मागणी त्यांनी केली. या आरोपांची चौकशी करण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्याची सूत्रांची माहीती आहे. यासंदर्भात आयुक्त सोनवणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
४०% टक्केवारीच्या आरोपाचे पुरावे द्या
By admin | Updated: December 22, 2014 22:19 IST