Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही दे दारू; दुकाने बंद असूनही विक्री जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना तसेच ...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना तसेच उद्योगधंदे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असले तरीदेखील या लॉकडाऊनच्या काळात दारूची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात हातभार लागत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून सुरुवातीचे काही महिने वाइन शॉप पूर्णपणे बंद होते. यामुळे दारू विक्रीदेखील झाली नव्हती. यानंतर दारू विक्रीला परवानगी देण्यात आली व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दारू खरेदी केली. तसेच मागच्या काळात ऑनलाइन दारू विक्रीलाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. राज्यात वर्षभरात ८६ कोटी लीटर दारूची विक्री होते. यामध्ये सर्वाधिक ३५ कोटी लीटर देशी दारू विकली जाते. त्यानंतर ३१ कोटी लीटर बीअर विकली जाते. तर २० कोटी लीटर विदेशी दारू विकली जाते व सर्वांत कमी ७० लाख लीटर वाइन विकली जाते.

किती लीटर दारू रिचवली

२०१९-२० : २८.८ कोटी

२०२०-२१ : ९.८९ कोटी

देशी : ८६ कोटी लीटर

विदेशी : २० कोटी लीटर

बीअर : ३५ कोटी लीटर

विदेशीची विक्री घटली, देशीची विक्री वाढली!

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात दारू विक्री काही प्रमाणात मंदावली होती. त्यानंतर दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर बीअर व विदेशी दारूच्या तुलनेत देशी दारूची विक्री अधिक झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यात वर्षभरात ३५ कोटी लीटर देशी दारूची विक्री झाली आहे. तर विदेशी दारूची विक्री २० कोटी लीटर झाली आहे.

महसूलला दारूचा आधार

दारू विक्रीतून २०१९-२० या वर्षात राज्याला १५ हजार ४२८ कोटी इतका महसूल मिळाला होता. तर २०२०-२१ या वर्षात राज्याला दारू विक्रीतून १९ हजार २२५ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्याला महिन्याला दारू विक्रीतून सरासरी १३ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो.

दारू जप्त

मागील लॉकडाऊनच्या काळात अवैध दारू विक्री प्रकरणी १२२१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात २ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच ३६ वाहने जप्त केली होती. यात ४७२ आरोपींना अटक करण्यात आली होती. राज्यात होणारी अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी शासनाच्या वतीने कठोर पावले उचलली जात आहेत.