Join us  

आमच्या वडिलांना ७० वर्षे प्रेम दिले, आता प्रार्थना करा, बॉलीवूडमधील हास्य अभिनेते जगदीपच्या मुलांची चाहत्यांना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 7:29 AM

आमच्या वडिलांनी चित्रपटसृष्टीसाठी ७० वर्षे दिली व त्यांना अपार प्रेम आणि आदर मिळाला. आज तेच प्रेम आम्हाला अनुभवास येत आहे. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केलीत तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल तसेच आम्हालाही समाधान मिळेल

मुंबई : आमच्या वडिलांनी चित्रपटसृष्टीसाठी ७० वर्षे दिली व त्यांना अपार प्रेम आणि आदर मिळाला. आज तेच प्रेम आम्हाला अनुभवास येत आहे. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केलीत तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल तसेच आम्हालाही समाधान मिळेल, अशी विनंती ‘शोले’मधील ‘सूरमा भोपाली’ची अजरामर भूमिका मागे ठेवून गेलेले बॉलीवूडमधील दिग्गज हास्य अभिनेते जगदीप यांच्या तिन्ही मुलांनी गुरुवारी केली.वयाच्या ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात करून ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांचे बुधवारी रात्री निधन झाले होते. गुरुवारी दुपारी ते राहत असलेल्या भायखळा येथील दफनभूमीत अत्यंत साधेपणाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता जावेद व निर्माता नावेद ही दोन मुले, नातू मीझान व बॉलीवूडमधील सहकलाकार जॉनी लिव्हर यांच्यासह फक्त १०-१२ जण या वेळी हजर होते. दफनविधीनंतर माध्यमांशी बोलताना चाहत्यांना वरीलप्रमाणे विनंती करत जावेद जाफरी म्हणाले की, असंख्य लोकांनी फोन करून तसेच मेसेज पाठवून दु:ख व्यक्त करत सांत्वन केले. सध्या आम्ही इंटरनेट वापरण्याच्या मन:स्थितीत नसल्याने या चाहत्यांचे आम्ही प्रत्यक्षात आभारही मानू शकत नाही.आणखी एक हिरा निखळला‘शोले’मध्ये जगदीपच्या सोबत ‘जय’ची भूमिका केलेले व जगदीप यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सूरमा भोपाली’मध्ये पाहुणे कलाकार झालेल्या सुपरस्टार अमिताब बच्चन यांनी चित्रपटसृष्टीतून आणखी एक हिरा निखळला, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली.बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले की, हास्यअभिनयाची अव्दितीय शैली असलेले जगदीप हे अगदी निगर्वी होते. लाखो चाहत्यांचे त्यांना अफाट प्रेम मिळाले. त्यांच्या कलाकारीने प्रेक्षकांच्या जीवनात आनंद व हास्य फुलविले.‘शोले’मधील दुसरे सहनायक धर्मेंद्र (वीरू) म्हणाले, जगदीप यांच्या निधनाने खूप दु:ख झाले. आम्ही दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले होते. ते केवळ विनोदी कलाकार नव्हते तर प्रतिभावंत अभिनेते होते. त्यांचा कधीच विसर पडणार नाही.

टॅग्स :बॉलिवूड