Join us

मुलींना शाळेतच मार्शल आर्ट्सचे शिक्षण दिले पाहिजे

By admin | Updated: August 7, 2014 00:43 IST

सध्याच्या काळात मुलींमध्ये शिकण्याची जिद्द असली तरी समाजातील असुरक्षिततेमुळे त्यांना घराबाहेर पडणो कठीण होते.

कांदिवली : सध्याच्या काळात मुलींमध्ये शिकण्याची जिद्द असली तरी समाजातील असुरक्षिततेमुळे त्यांना घराबाहेर पडणो कठीण होते. यासाठी आता शाळांनीच पुढाकार घेत मुलींना मार्शल आर्ट्सचे शिक्षण दिले पाहिजे, असे मत अभिनेत्री राणी मुखर्जी हिने व्यक्त केले. कठीण परिस्थितीवर मात करत धाडसाने शिक्षण घेणा:या चारकोप येथील प्रियदर्शनी विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थिनींना ‘शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला राणी मुखर्जी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती.
मुलींना प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद शाळेपासूनच दिली पाहिजे. कोणीही छेड काढली तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी मार्शल आर्ट्स शाळांमध्ये शिकवले गेले पाहिजे, असे राणी पुढे म्हणाली. आपल्यावर अन्याय झाला, तर त्यासाठी कुणीतरी न्याय मिळवून देण्याची वाट पाहू नका, स्वत:च पुढे होऊन लढा, असा सल्लाही राणीने मुलींना दिला.
‘सपोर्ट माय स्कूल’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना ‘शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले. गरीब परिस्थितीतून आलेल्या या विद्यार्थिनी शालेय अभ्यासक्रमात तसेच विविध खेळ, स्पर्धामध्ये अव्वल क्रमांक मिळवत आहेत. अशा पूजा तोरसकर, नेहा बोके, ऋतुजा हिंदळेकर, मानसी खैरनार आणि कोमल वारखडे या पाच मुलींचा राणीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पूजा तोरसकर ही विद्यार्थिनी अपंग असून पाठीच्या मणक्यात सळी घातली असूनही वेदना सहन करत दहावीच्या परीक्षेत तिने 83 टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या धाडसाबद्दल तिला शौर्यपदक देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)