Join us

प्रेमीयुगुलातील मुलीची हत्या की आत्महत्या?

By admin | Updated: December 7, 2015 01:52 IST

गणेशपुरी येथे लॉजमध्ये उतरलेल्या प्रेमीयुगुलातील मुलीचा गळफासाने मृत्यू झाल्याची नोंद भिवंडीतील शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, ही हत्या की आत्महत्या, अशी चर्चा सुरू आहे.

भिवंडी : गणेशपुरी येथे लॉजमध्ये उतरलेल्या प्रेमीयुगुलातील मुलीचा गळफासाने मृत्यू झाल्याची नोंद भिवंडीतील शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, ही हत्या की आत्महत्या, अशी चर्चा सुरू आहे. मीनल दिनेश दुभेळे (२०) असे मृत मुलीचे नाव असून, तिचे आईवडील वारल्याने ती शहापूर तालुक्यातील शेडगाव येथे मामाकडे राहत होती. तालुक्यातील कशेळीमध्ये राहणाऱ्या कुणाल वाल्मिक पाटील (२४) याचे गेल्या वर्षापासून तिच्याशी प्रेमसंबंध होते. पाटील व दुभेळे दोन्ही कुटुंबांची संमती असल्याने दोन महिन्यांत त्यांचे लग्न होणार होते. दरम्यान, शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी दोघे वज्रेश्वरी येथे जाऊन लॉजमध्ये उतरले होते. तेथून कुणाल बाहेर निघाला व काही वेळाने तो लॉजमध्ये परतला, तेव्हा मीनल बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. लॉजच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला प्रथम अंबाडी, नंतर भिवंडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मीनल काल शनिवारी पहाटे मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या संदर्भात गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)