नवी मुंबई : कोपरखैरणे येथील नाल्यामध्ये मृत आढळलेल्या किस्मत गुदडावत (२५) हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्याच प्रियकराला अटक केली आहे. ठरलेले लग्न मोडल्यानंतरही दोघांमधील प्रेमसंबंध पंचायतीसमोर उघड करण्याची भीती दिल्याने प्रियकराने तिची हत्या केली होती.दंगलसिंह कर्मावत (२९) असे एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. दंगलसिंह हा मूळचा मध्य प्रदेशचा राहणारा आहे. त्याचे १२ वर्षांपूर्वी किस्मत गुदडावत हिच्यासोबत लग्न ठरले होते. यावेळी प्रथेप्रमाणे लग्नासाठी किस्मतच्या घरच्यांनी अडीच लाख रुपयांची मागणी दंगलसिंहच्या कुटुंबीयांकडे केलेली. त्यापैकी केवळ पावणे दोन लाख रुपयेच दिले गेल्याने तीन वर्षांनी हे लग्न मोडले होते. त्यामुळे घेतलेली रक्कमही जातपंचायतीच्या मध्यस्थीने परत देण्यात आलेली. याचदरम्यान दंगलसिंह व किस्मत यांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. परंतु किस्मतचे दुसरीकडे लग्न जुळेना म्हणून घरच्यांनी तिला मुंबईत बारमध्ये काम करण्यासाठी पाठवले होते. तर दंगलसिंहच्या कुटुंबीयाने दुसऱ्या मुलीसोबत त्याचे लग्न लावून दिलेले. मात्र ठरलेले लग्न मोडल्यानंतरही गेल्या पाच वर्षांपासून ते दोघेही फोनवरून तसेच प्रत्यक्ष गाठीभेटीतून संपर्कात होते.किस्मतही मुंबईला आल्यामुळे तिला भेटण्यासाठी दंगलसिंह देखील मुंबईला येऊन कोपरखैरणे येथे बहिणीच्या घरी राहायचा. त्याप्रमाणे १० फेब्रुवारी रोजी किस्मतला भेटण्यासाठी त्याने मुंबई गाठली. सेक्टर-११ येथील बहिणीच्या घरी कोणीच नसल्याने त्याने किस्मतला तेथे बोलावले. यावेळी दोघांचे शरीरसंबंध झाल्यानंतर किस्मतने आपण बारच्या नोकरीत समाधानी नसल्याचे त्याला सांगितले. तसेच मलाही तुझ्यासोबत घेऊन चल, असा तगादाही लावला होता. परंतु त्याने आपला विवाह झालेला असल्याने तिला सोबत नेण्यास नकार दिला. यावेळी दोघांमध्ये भांडण झाले असता दंगलसिंहने किस्मतला मारले. त्यामुळे आपल्यातील प्रेमसंबंधाची माहिती गावच्या जातपंचायतीला सांगून बदनामी करण्याची धमकी किस्मतने दिली.त्यामुळे दंगलसिंह तीची गळा आवळून हत्या केली. रात्री १२च्या सुमारास मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून स्कूटीवरून नेऊन नाल्यामध्ये टाकला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्याचे उपआयुक्त उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या पथकाने अवघ्या आठ दिवसांत दंगलसिंह याला मध्य प्रदेशातून अटक केली. (प्रतिनिधी)दंगलसिंहपासून किस्मतला एक मुलगीहत्येच्यावेळी किस्मत चार महिन्यांची गरोदर होती. मात्र ठाणेमध्ये तिचा एक प्रियकर असल्याने हे मूल कोणाचे ते स्पष्ट झालेले नाही. परंतु दंगलसिंह याच्यापासून तिला यापूर्वी एक अडीच वर्षांची मुलगी आहे. ती संगोपनासाठी किस्मतच्या आईकडे गावी असते. अशातच दुसऱ्यांदा गरोदर राहिल्याने तिने आपल्याला सोबत ठेवण्याचा तगादा दंगलसिंहकडे लावलेला. तसेच प्रेमसंबंधाची माहिती जातपंचायतीला देऊन बदनामी करण्याचेही धमकावले. ही बाब दंगलसिंहला खटकल्याने त्याने गळा आवळून तिची हत्या केली.किस्मतने जातपंचायतकडे आपली तक्रार केल्यास आर्थिक फटका बसण्याची भीती दंगलसिंहला होती. गावातील वादाची प्रकरणे जातपंचायतीकडे गेल्यास मारहाण करून दंडाच्या स्वरूपात लाखो रुपयेही मागितले जातात. त्यामुळे किस्मतने आपली तक्रार जातपंचायतीकडे केल्यास केवळ शेतीच्या जोरावर ही रक्कम भरू शकत नाही, या भीतीने त्याने किस्मतचीच हत्या करून तिचा मृतदेह नाल्यामध्ये टाकलेला.
प्रेयसीची हत्येप्रकरणी प्रियकराला अटक
By admin | Updated: February 21, 2015 01:29 IST