Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची हत्या करणार्‍या तरुणाला अटक

By admin | Updated: May 22, 2014 03:13 IST

मध्य मुंबईत खाणावळ चालविणार्‍या ५० वर्षीय महिलेची घरात घुसून हत्या करणार्‍या तरुणाला गुन्हे शाखेने गोव्याच्या कोलवा समुद्रकिनार्‍यावरून अटक केली.

मुंबई : मध्य मुंबईत खाणावळ चालविणार्‍या ५० वर्षीय महिलेची घरात घुसून हत्या करणार्‍या तरुणाला गुन्हे शाखेने गोव्याच्या कोलवा समुद्रकिनार्‍यावरून अटक केली. कोल्हापूरचा रहिवासी असलेला आरोपी तरुण आणि मृत महिलेचे अवैध संबंध होते. या संबंधांची माहिती तरुणाच्या पत्नीसह कुटुंबाला समजली. त्यावरून वाद झाला आणि पत्नीने त्याला सोडले. मात्र खाणावळ चालविणार्‍या महिलेचे अन्य पुरुषांशी संबंध असल्याची माहिती तरुणाला मिळाली आणि तो हताश झाला. या महिलेच्या नादात पत्नी आणि मुलांशी संबंध तोडल्याची सल आरोपी तरुणाला खाऊ लागली. बदला घेण्याच्या इराद्याने १ एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास तो खाणावळ चालविणार्‍या महिलेच्या घरात घुसला आणि धारदार सुरीने तिच्यावर वार करून पसार झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकार्‍यांनी समांतर तपास सुरू केला. तपासात प्रभारी निरीक्षक प्रशांत राजे, एपीआय अविनाश कवठेकर, पांडुरंग सणस, एएसआय सुनील मोरे, शिपाई हृदयनाथ मिश्रा, माने, सोनावणे आणि शिर्के या पथकाला हा तरुण गोव्याच्या कोलवा परिसरात नाव बदलून वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने गोव्यात जाऊन या तरुणाला अटक केली. पुढील कार्यवाहीसाठी त्याला ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)