Join us

गिरगाव चौपाटीवर मासेमारी

By admin | Updated: October 5, 2015 02:45 IST

मुंबईच्या मासेमारी बंदरांमधून शासनाने गिरगाव चौपाटीला वगळल्याचे कारण देत मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांनी येथील मासेमारांना इतर बंदरांवरून मासेमारी करण्याचे आदेश दिले होते

मुंबई : मुंबईच्या मासेमारी बंदरांमधून शासनाने गिरगाव चौपाटीला वगळल्याचे कारण देत मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांनी येथील मासेमारांना इतर बंदरांवरून मासेमारी करण्याचे आदेश दिले होते, मात्र मच्छीमारांनी मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे धाव घेत तूर्तास दिलासा मिळवला आहे.सहायक आयुक्तांनी गिरगाव चौपाटीवर मासेमारी करणाऱ्या ४१ नौका मालकांना इतरत्र मासेमारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती नेते दामोदार तांडेल यांनी दिली. तांडेल म्हणाले, धनदांडग्यांच्या दबावामुळे मच्छीमारांना येथून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. देसाई यांनी दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करीत मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. तूर्तास तरी खडसे यांनी आदेश दिल्याने मत्स्यव्यवसाय विभाग कारवाई करणार नसल्याचा दावा तांडेल यांनी केला आहे. मात्र निर्णय रद्द झाल्याचे परिपत्रक निघत नाही तोपर्यंत टांगती तलवार राहणार आहे. आदेश रद्द करण्याचे परिपत्रक काढले नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.