Join us

गिरगाव चौपाटीवर फ्लोटेल, सी प्लेन

By admin | Updated: November 10, 2016 06:39 IST

गिरगाव चौपाटीवर येणार्‍या हजारो पर्यटकांसाठी आता वॉटर स्पोर्ट्सबरोबरच समुद्रातील हॉटेल (फ्लोटेल) आणि सी प्लेनची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

यदु जोशी, मुंबईगिरगाव चौपाटीवर येणार्‍या हजारो पर्यटकांसाठी आता वॉटर स्पोर्ट्सबरोबरच समुद्रातील हॉटेल (फ्लोटेल) आणि सी प्लेनची सुविधाही उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी दोन जेट्टी उभारण्यात येणार असून, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि राज्य शासन यांचा हा संयुक्त उपक्रम असेल. गिरगाव चौपाटीवर असलेल्या मफतलाल क्लबच्या बाजूला १४ वर्षे सुरू असलेले एचटू वॉटर स्पोर्ट्स सेंटर गेल्या वर्षी बंद पडले. आता हे केंद्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) हातात पुन्हा आले आहे. ही ५ हजार चौरस फूट जागा आणि बाजूची समुद्रातील जागा मिळून आता दोन जेट्टी आणि अत्याधुनिक पर्यटनसुविधा उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी राज्यभरातून येणार्‍या पर्यटकांसाठी आकर्षणाचे हे नवे केंद्र असेल. महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी आणि मुंबईच्या जिल्हाधिकारी अश्‍विनी जोशी आदींनी आज या जागेची पाहणी केली. भाटिया यांनी 'लोकमत'ला सांगितले की, या प्रकल्पासाठी कोचीन येथील एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या जेट्टीवरून बोटींद्वारे जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. शिवाय, सी प्लेनचीही सुविधा असेल. पर्यटकांसाठी पंचतारांकित सुविधांनी युक्त असे फ्लोटेल हे मुख्य आकर्षण असेल. चौपाटीवर २00१ पासून दृष्टी अँडव्हेंचर स्पोर्टस्च्या वतीने वॉटर स्पोर्ट्स सुरू झाले. या एचटू वॉटर स्पोर्ट्स अँडव्हेंचर सेंटरमध्ये अभिनेता सुनील शेट्टी याच्या कंपनीची भागिदारी होती. राज्य पर्यटन विकास महामंडळाला त्यातून दर महिन्याला १७ लाख रुपये भाडेही मिळायचे. मात्र, उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने त्या ठिकाणी रेस्टॉरन्टमध्ये अन्न शिजविण्यावर आक्षेप घेतला. त्या नंतर तेथे येणार्‍या पर्यटकांना बाहेरून तयार करून आणलेले अन्नपदार्थ देण्यात येऊ लागले. मात्र, त्यावरही आक्षेप घेण्यात आला. महापालिकेनेही त्यासाठी परवाना दिला नाही. त्यामुळे शेवटी हे सेंटरच बंद करण्यात आले. या सेंटरचा ताबा तेथील बोट आदी साहित्यासह पर्यटन महामंडळाने स्वत:कडे घेतला आहे. घोडागाडी व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी समितीविशेषत: दक्षिण मुंबईत पर्यटकांच्या सेवेत वर्षानुवर्षे असलेल्या घोडागाडी (व्हिक्टोरिया) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात येणार आहेत. या घोडागाडी चालक/मालकांना फेरीवाला परवाने देणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उपसमिती नेमण्यात आली. मेट्रो टप्पा ३ साठी मंत्रालयासमोरील फ्री प्रेस र्जनल मार्गावरची शासकीय कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात हलविण्याचे आदेश, आज सामान्य प्रशासन विभागाने काढले. त्यानुसार, अभियोग संचलनालय, रंगभूमी प्रयोग व परीनिरीक्षण मंडळ, माहिती व जनसंपर्क (प्रकाशने विभाग), पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, संचालक लेखा व कोषागारे यांची कार्यालये पोर्ट ट्रस्टच्या पोर्ट हाउसमध्ये हलविण्यात येतील. अधिदान व लेखाधिकारी यांचे कार्यालय यूबीआय बिल्डिंग; चर्चगेट येथे हलविण्यात येणार आहे.