कमलाकर कांबळे ल्ल नवी मुंबईमहापालिका निवडणुकीसाठी आज प्रभाग रचना आणि महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत विविध राजकीय पक्षांतील दिग्गजांची दांडी उडाली आहे. पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला खो बसला आहे.महापालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रभाग रचना आणि महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. सध्या महापालिकेत ८९ प्रभाग आहेत. मात्र सन २०११ च्या जनगणनेत नोंदविल्या गेलेल्या ११ लाख २० हजार लोकसंख्येच्या आधारे प्रभागांची संख्या १११ इतकी करण्यात आली आहे. त्यासाठी सोडत घेऊन आज आरक्षण काढण्यात आले. खुल्या प्रवर्गासह अनुचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग अशा एकूण ५६ महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याचे अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. विशेषत: महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला या आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे. महापौर सागर नाईक यांचा प्रभागही इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्याशिवाय उपमहापौर अशोक गावडे, माजी उपमहापौर भरत नखाते, सभागृह नेते अनंत सुतार, संपत शेवाळे, राजू शिंदे, वैभव गायकवाड, केशव म्हात्रे, किशोर पाटकर या राष्ट्रवादीच्या दिग्गज नगरसेवकांना आता सभागृहाबाहेर राहावे लागणार आहे. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, संतोष शेट्टी, अमित पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे, माजी विरोधी पक्षनेते विजयानंद माने, दिलीप घोडेकर, बहादूर बिष्ट, मनोज हळदणकर, जगदीश गवते आदींच्या प्रभागात आरक्षण पडल्याने महापालिकेतील त्यांच्या पुनर्प्रवेशासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. लोकसंख्येनुसार यावेळी प्रभागांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभागांच्या रचनेतही बदल करण्यात आला आहे. त्यासाठी यावेळी प्रथमच गुगल अर्थ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांशी प्रभागांच्या भौगोलिक रचनेत बदल झाला आहे. याचा फटका विद्यमान नगरसेवकांसह मागील पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना बसला आहे. त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यावेळी पहिल्यांदाच महिलांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी सभागृहात महिलांचे संख्याबळ अधिक पाहावयास मिळणार आहे. नवीन गवते-अपर्णा गवते, शिवराम पाटील-अनिता पाटील, एम. के. मढवी-विनया मढवी या नगरसेवक जोडप्यांचे प्रभाग कायम राहिले आहेत. तर काँग्रेसचे संतोष शेट्टी व अनिता शेट्टी या दाम्पत्याच्या दोन्ही प्रभागांवर इतर मागासवर्गीय प्रभागासाठी आरक्षण पडले आहे.
दिग्गजांची दांडी गूल
By admin | Updated: February 8, 2015 00:37 IST