मुंबई : घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाचा पाठिंबा मिळणार आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समाज प्रबोधिनी या संस्थेच्या हजारो सदस्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी मातंग समाजाच्या न्याय-हक्कांसाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. हा सगळा कार्यभार त्यांनी सांभाळला तो घाटकोपर पश्चिमेकडील चिरागनगरमधील एका लहानशा कार्यालयातून. ही वास्तू गेल्या अनेक वर्षांंपासून दुर्लक्षित व नादुरुस्त अवस्थेत होती. अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर ही ऐतिहासिक वास्तू नव्याने उभारण्याची आश्वासने दिली आणि नंतर मातंग समाजाच्या तोंडाला पाने पुसली. पण मनसेनेचे विभाग अध्यक्ष म्हणून जबाबदारी येताच लांडेंनी या वास्तूला भेट दिली. अण्णा भाऊंच्या कार्याची महती व त्यांचा आदर्श भावी पिढीसमोर ठेवण्यासाठी त्यांनी सदर वास्तूचे नूतनीकरण करण्याचा संकल्प केला आणि तो त्वरित तडीसही नेला. कोणतेही आश्वासन न देता थेट काम करून दाखवले म्हणून मातंग समाजाने त्यांना पाठिंबा जाहीर केला. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समाज प्रबोधिनी, मुंबईचे अध्यक्ष रघुनाथ साठे, उपाध्यक्ष मोहन साठे, चंद्रकांत साठे, सेक्रेटरी अनिल साठे, विश्वनाथ लोंढे, सहसेके्रटरी मनोज साठे, शरद बल्लाळ, खजिनदार दिनकर चव्हाण यांनी तसे लेखी पत्रही लांडे यांना पाठवले आहे. (प्रतिनिधी )
घाटकोपरमध्ये मातंग समाज मनसेच्या पाठीशी
By admin | Updated: October 11, 2014 03:31 IST