Join us

घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 5:27 AM

पाया मजबुतीची करणार तपासणी, मृतांचा आकडा १६ वर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :घाटकोपर येथे होर्डिंग्ज कोसळून झालेल्या दुर्घटनेचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी वीरमाता जिजाबाई  टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या (व्हीजेटीआय) तज्ज्ञांची समिती नेमली आहे.  ही समिती होर्डिंग्जच्या पाया मजबुतीकरणाविषयी बाबींची माहिती घेऊन तपासणी करणार आहे. होर्डिंग्जची स्टॅबिलिटी किती होती? त्यासंबंधी आवश्यक बाबी पूर्ण केल्या होत्या का? याची माहिती महत्त्वाची असल्याने ही समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी ढिगाऱ्याखाली आणखी दोन मृतदेह सापडल्याचे समजते. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या १६ झाली आहे. मृतदेह राजावाडी रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवल्याची माहिती आहे. 

पालिकेकडून कोणत्याही अधिकृत होर्डिंग्जसाठी ४० बाय ४० पेक्षा अधिकची परवानगी दिली जात नाही. मात्र दुर्घटनेतील होर्डिंग्ज ही १२० बाय १२० या आकाराचे असल्यामुळे त्याच्या पायाची मजबुती किती होती? त्यासंबंधी आवश्यक बाबींची काळजी घेतली होती का, या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. एकूणच होर्डिंग्जची संरचनात्मक मजबुतीसाठी  तांत्रिक बाबींची माहिती घेणे गरजेचे आहे. होर्डिंग्जची संरचनात्मक मजबुती आणि पाया किती व कसा असावा यासाठी  भौगोलिक बाबींचा अभ्यास आवश्यक असतो. मात्र दुर्घटना झालेल्या प्रकरणात पालिकेची परवानगी न घेता होर्डिंग्ज उभारल्यामुळे तसेच रेल्वे पोलिसांनी परस्पर परवानगी दिल्याने या बाबी दुर्लक्षित झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

मालाडमध्ये कारवाई 

मालाड पश्चिम येथील एम. एम. मिठाईवाला या दुकानावर १५ x १० आकाराचा चहूबाजूने उभारलेला अनधिकृत जाहिरात फलक मंगळवारी काढण्यात आला. पी उत्तर विभागातील अनुज्ञापन खात्यामार्फत १ निरीक्षक, ४ कामगार यांच्या साहाय्याने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

मध्य आणि पश्चिम रेल्वेला नोटिसा

घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेने आता शहरातील अवैध होर्डिंग्जवर कारवाईचा सपाटा लावला आहे. घाटकोपरमधील तीन जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. घाटकोपर दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक असल्यास ते तातडीने काढण्याच्या सूचना या नोटिशीद्वारे देण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील जाहिरात फलक तातडीने काढण्याच्या सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत.

भिंडे सतत लोकेशन बदलत असल्याने...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार धरत गुन्हा दाखल झाल्यापासून भावेश भिंडे मुंबईबाहेर पसार झाला आहे. त्याच्या मागावर ७ तपास पथके असल्याचे समोर येत आहे. भावेश सतत लोकेशन बदलत आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे पसार झाला. त्याचे पुणे नंतर नाशिकमध्ये लोकेशन सापडले. त्यानंतर पुन्हा लोकेशन सापडले नाही. 

तो सतत लोकेशन बदलत असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दुर्घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या मुलुंड येथील घरी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तो कुटुंबासमवेत गायब असल्याचे लक्षात आले. त्याचा शोध सुरू आहे. त्याच्या जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींकडूनही पोलिस माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :घाटकोपरमुंबई