मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या जखमा कायम आहेत. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे होर्डिंग हटले, तरी त्याचा सांगाडा अजूनही तसाच आहे. त्या परिसरातून जाताना आजही हृदयात चर्रर्र होते, असे दुर्घटनेतील जखमी सांगतात.
घाटकोपरच्या रमाबाईनगर परिसरात पत्नी, तीन मुले आणि एक मुलीसोबत राहणाऱ्या अशोक गुप्ता यांचा पाय यावेळी फ्रॅक्चर झाला. गुप्ता सांगतात, गॅरेजमध्ये नोकरी करून कुटुंबाची जबाबदारी उचलत होतो. मात्र या अपघाताने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. वर्षभरानेही ती जखम कायम आहे. पहिल्यासारखं ना मनसोक्त फिरू शकतो ना काम करू शकतो. मुलंच माझा सांभाळ करतात. शासनाने १६ हजारांची मदत केली. उपचारावरील खर्च मात्र ५ ते ६ लाखांवर गेल्याचे ते सांगतात.
खर्च लाखात झाला, सरकारने दिले फक्त १४-१५ हजार
रमाबाई नगरातील शुभम गांगुर्डेही या अपघातात थोडक्यात बचावला. शुभमच्या काकी स्नेहा गांगुर्डे सांगतात, नवऱ्याने वाढदिवसानिमित्त दुचाकी घेतली. चार दिवसाने शुभमने हौसेने गाडी मागितली. मी नको नको म्हणत होते; पण तो दुचाकी घेऊन गेला आणि दुर्घटनेत अडकला. तो दिवस आठवला की आजही घाबरायला होते. शासनाकडून १४ ते १५ हजार मिळाले. मात्र खर्च लाखात झाला. होर्डिंग्ज खाली दबलेल्या शुभमने हातातील कड्याने होर्डिंग फाडून त्यातून मार्ग काढला. मात्र, ती जखम कायम आहे.
शुभम आजही जोराचा वारा, वादळ आला की घाबरतो. काही दिवसांपूर्वी आलेल्या वाऱ्याने तो घाबरून घरातच थांबला. त्याच्या मणक्यात दोन गॅप पडले आहेत. जास्त चालला की त्याला थकायला होते. दुर्घटनेनंतर त्याने सहा महिने अंथरूणावरच काढले. बारावीत असल्याने त्याने जिद्दीने कॉलेजमध्ये जाण्याचा हट्ट धरला. मित्रच त्याची बॅग उचलून कॉलेजपर्यंत न्यायचे. अखेर, जास्त त्रास झाल्याने घरूनच अभ्यास करण्याबाबत कॉलेजमधून परवानगी घेतली. वेदनांकडे दुर्लक्ष करत अभ्यास केला आणि यंदा पासही झाला, आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या.