Join us

सुविधांअभावी पटसंख्येला ‘घरघर’

By admin | Updated: July 7, 2015 00:26 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांचे एकंदरीत चित्र पाहता या ठिकाणी मराठी माध्यमाची पटसंख्या समाधानकारक नसल्याचे दिसून येते.

प्रशांत माने  कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांचे एकंदरीत चित्र पाहता या ठिकाणी मराठी माध्यमाची पटसंख्या समाधानकारक नसल्याचे दिसून येते. पुरेशा सोयीसुविधा नसल्याने पालक आपल्या पाल्याला या शाळांमध्ये पाठवायला सहसा तयार होत नाहीत. पश्चिमेकडील नवापाडा परिसरातील क्रांतिवीर चाफेकर बंधू विद्यालयातदेखील अशीच परिस्थिती असून सुविधांअभावी येथील पटसंख्येला घरघर लागली आहे.१९७२ साली ही शाळा बांधण्यात आली, तर २००५ मध्ये शाळेच्या वास्तूचे नूतनीकरण करण्यात आले. दुमजली इमारतीत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग भरत असले तरी विद्यार्थी पटसंख्या केवळ २५ इतकीच आहे. शिकविण्यासाठी तीन शिक्षकांची नेमणूक केली आहे. संगणक आहेत, परंतु ते नादुरुस्त असल्याने विद्यार्थी संगणक ज्ञानापासून वंचित आहेत. सद्य:स्थितीला शाळा सुस्थितीत आहे. मात्र, या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने येथील शाळेच्या आवारातील सामानाचे नुकसान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याबाबत, तक्रारी करूनही सुरक्षेची कोणतीही उपाययोजना आजवर केलेली नाही. सफाई कर्मचारी न दिल्याने आरोग्य विभागाला संपर्क साधल्यावरच शाळेची साफसफाई होत आहे. कर्मचाऱ्यांअभावी होणाऱ्या गैरसोयींकडे वारंवार लक्ष वेधूनही संबंधित प्रशासनाकडून मात्र डोळेझाक केली जात आहे.