Join us  

घारापुरी बेट विदेशी पर्यटकांच्या पसंतीचे पाहिले स्थान बनविणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 11:35 PM

जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावर पर्यटकांच्या दृष्टीने सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार असून  विदेशी पर्यटकांचे पहिल्या पसंतीचे स्थान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  केबल कार, मिनी ट्रेनच्या माध्यमातून या बेटाचे सौंदर्य पर्यटकांना अनुभवता यावा यादृष्टीने विचार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मुंबई : जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावर पर्यटकांच्या दृष्टीने सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार असून  विदेशी पर्यटकांचे पहिल्या पसंतीचे स्थान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  केबल कार, मिनी ट्रेनच्या माध्यमातून या बेटाचे सौंदर्य पर्यटकांना अनुभवता यावा यादृष्टीने विचार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.मुंबई जवळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, घारापुरी बेटावरील नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सत्तर वर्षानंतर या बेटाला वीजपुरवठा झाला. त्यासाठी ऊर्जा विभागातल्या अधिकाऱ्यांनी जगातले सर्वोत्तम तंत्रज्ञान शोधून आणले. देशात प्रथम समुद्राखालून केबल टाकून बेटाचे विद्युतीकरण होऊ शकले.  बेटावर आता वीज आली आहे, मात्र पर्यटकांच्या दृष्टीने  सोयी सुविधा होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पर्यटन विभागाने 98 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला असून 2 कोटी रुपये वितरित करून कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे.बेटावर जेट्टी, रस्ते, पर्यटक निवासाची व्यवस्था केल्यास त्यांना रात्री मुक्काम करता येईल. निवास न्याहरी व्यवस्थेबाबत बेटावरील ग्रामस्थांना प्रशिक्षण दिल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. या बेटावर केबल कार करण्याचा मानस असून संपूर्ण बेटाच्या भोवती मिनी ट्रेन सुरू करून बेटाचे सौंदर्य पाहण्याची सोय करण्यात येईल. यापूर्वी बेटावर डिझेल इंजिनच्या सहाय्याने वीजपुरवठा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून केला जात होता त्यासाठी दररोज 26 हजार रुपये खर्च यायचा. आता हा खर्च वाचणार असून त्याचा उपयोग पर्यटकांच्या सोयीसाठी केला जाईल. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. स्वच्छतेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक शक्ती निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात घारापुरी बेट अंधाराच्या पारतंत्र्यात होते, येथे वीज आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्यामुळे आज या बेटाला प्रकाशाच्या निमित्ताने स्वातंत्र्य मिळाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने येथे घराघरात प्रकाश आला आहे. येथे वीज आली मात्र प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात प्रकाश निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. मानवता हा धर्म सर्वात श्रेष्ठ असून प्रत्येकाने तो जपावा. शिक्षणाच्या ज्ञानप्रकाशातून अंधश्रध्दारुपी अंधार दूर सारला जातो, असेही त्यांनी सांगितले. ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र भारनियनम मुक्त करण्यात येत असून आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकाला विजेची जोडणी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी एक योजना केली असून डिसेंम्बर 2018 पर्यंत सर्वत्र व8ज जोडणी दिली जाईल. घारापुरी बेटावर चारही बाजूने 2 कोटी रुपये खर्च करून एल ई डी दिवे बसविण्यात येतील. त्यामुळे संपूर्ण बेट प्रकाशाने उजळून निघेल.पुढील तीन महिन्यात हे काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पथदिव्याचे बटन दाबून संपूर्ण गावाच्या विद्युतीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाच जणांना प्रातिनिधीक स्वरूपात वीज मीटरच्या जोडणीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. जेएनपीटी येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसमर्थ स्मारकाबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी आदिसह ग्रामस्थ  उपस्थित होते. 

 युनेस्को मान्यता प्राप्त जागतिक वारसा लाभलेले घारापुरी बेट हे महत्वाचे पर्यटनस्थळ असून ते पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. बेटावर पर्यटन विकास महामंडळातर्फे डिझेल विद्युत जनित्राव्दारे वीज पुरवठा करण्यात येत होता. मात्र महावितरणच्या भांडुप परिमंडळामार्फत एमएमआरडीएच्या आर्थिक सहाय्याने समुद्रातळाअंतर्गत 95 चौ.मी.मीची 7.5 कि.मी.लांबीची 22 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी टाकुन बेटास कायमस्वरुपी वीजपुरवठा सुरु झाला आहे. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या लांबीची वीज वाहिनी समुद्रतळातुन टाकण्यात आली आहे. महावितरण या भागात वीज पोहोचविण्यात यशस्वी झाले असून या बेटावरील शेतबंदर, राजबंदर,मोराबंदर या तीनही गावांमध्ये 200 के.व्ही.चे रोहित्र महावितरणतर्फे लावण्यात आले आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई