Join us

वारंवार आजारी पडताय; पाण्याची टाकी तपासली का? फायर, स्ट्रक्चरल ऑडिट एवढे हेही महत्त्वाचे आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 13:30 IST

Health: वर्षातून किमान दोन वेळ सोसायटीच्या पाण्याची टाकी साफ करण्याची गरज असतानाच हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत गृहनिर्माण संस्था वगळल्या तर बहुसंख्य सोसाट्यांकडून याबाबत निष्काळजीपणा बाळगला जातो.

मुंबई - घरातल्या पाण्याच्या टाकीप्रमाणे सोसायटीच्या पाण्याच्या टाकीची काळजी घेतली जात नाही. वर्षातून किमान दोन वेळ सोसायटीच्या पाण्याची टाकी साफ करण्याची गरज असतानाच हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत गृहनिर्माण संस्था वगळल्या तर बहुसंख्य सोसाट्यांकडून याबाबत निष्काळजीपणा बाळगला जातो. परिणामी, टाकीतूनच अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका असतो किंवा इतर अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.

परिणामी, हे धोके टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरातील गृहनिर्माण संस्थांनी वर्षातून किमान दोन वेळा आपल्या इमारतीची पाण्याची कॉमन टाकी साफ करावी, असे आवाहन गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

जबाबदारी कोणाची ?मुंबईला महापालिकेकडून पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी टाकी साफ करण्याची जबाबदारी पालिकेची नसून गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची आहे. 

टाकी कशी साफ कराल?     टाकीचे नळ खुले करून टाकीमध्ये जमा असलेले पाणी सोडून देण्यात यावे.    टाकीच्या भिंतींना असणारे शेवाळ, कचरा, ब्लिचिंग / क्लोरिन पावडरचा वापर करून काढण्यात यावा.    गाळ, शेवाळे टाकीच्या आऊटलेट वॉलमधून बाहेर काढण्यात यावे.    वर्षांतून कमीत कमी २ वेळा पाण्याची टाकी स्वच्छ किंवा निर्जंतुक करावी.

महापालिकेने केवळ निर्देश देणे कामाचे नाहीतर अशा प्रकरणांत सोसाट्यांना वॉर्डस्तरावर रिपोर्ट सादर करणे बंधनकारक केले पाहिजे. या पद्धतीने कारवाई झाली, तर सोसायट्या कॉमन टाकीकडे लक्ष देतील.- विनोद घोलप, अध्यक्ष, फाइट ऑफ राइट फाउंडेशन

प्रत्येकीवेळी महापालिकेनेच निर्देश दिले पाहिजेत, असे नाही. गृहनिर्माण संस्थांनी स्वत:हून सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वर्षातून दोन, एक वेळा कॉमन टाकीची स्वच्छता केली पाहिजे. सोसायटीच्या मीटिंगमध्ये यावर चर्चा झाली पाहिजे. मात्र, मीटिंगमध्ये वादाशिवाय काहीच होत नाही.- राकेश पाटील, स्थानिक, कुर्ला

पालिकेने पाहणी केली ?गृहनिर्माण संस्थांकडून या प्रकरणात निष्काळजीपणा बाळगला जातो. परिणामी, महापालिका ज्या पद्धतीने फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आग्रही असते त्याप्रमाणे यासाठीही पालिकेने निर्देश दिले पाहिजेत, असे गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई