मुंबई : कायद्याच्या चौकटीत राहून दहीहंडी साजरा करण्याचा भाजपा-शिवसेनेचा दावा पोकळ ठरला. युती पुरस्कृत मंडळांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांची सररास पायमल्ली केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. सरकारने नियमांचा बागुलबुवा केल्याने यंदा दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांचा नेहमीचा सहभाग व जोष दिसला नाही. त्यामुळे किमान पुढच्या वर्षी गोविंदाला नियमांच्या कचाट्यातून मोकळे करा, असे आवाहनही अहिर यांनी केले. यंदा दहीहंडीवर मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. त्यामुळे असंख्य गोविंदा पथकांनी उत्सवातून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या उत्सवाची दरवर्षीसारखी धूम पाहायला मिळाली नाही; तर दुसरीकडे कायद्याच्या चौकटीत दहीहंडी साजरी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा पोकळ ठरला. सत्ताधारी पक्षाचे नेते आयोजक असलेल्या मंडळांमध्येच उच्च न्यायालयाने घातलेल्या २० फुटांच्या उंचीच्या मर्यादेचे सररास उल्लंघन पाहायला मिळाले. तसेच या मंडळांद्वारे गोविंदांच्या सुरक्षेचेही नियम पायदळी तुडवण्यात आले असून, आवाजाचा ६० डेसिबल्सची मर्यादाही पाळण्यात आली नाही. त्यामुळे आता राज्य सरकार आपल्याच नेत्यांवर काय कारवाई करणार हे आम्हाला पाहायचे असल्याचेही अहिर म्हणाले. दहीहंडीमुळे अवघ्या जगभरात मुंबई आणि महाराष्ट्राचे नाव पोहोचले आहे. त्यामुळे हा उत्सव बंद पडेल अशी कोणतीही गोष्ट सरकारने करू नये, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.
नियमांच्या कचाट्यातून मुक्त करा
By admin | Updated: September 7, 2015 01:06 IST