मुंबई : सीमा लढ्यात महाराष्ट्राचा सहभाग मिळवण्यास समन्वय समिती स्थापन केली. सीमा प्रदेशातील हुतात्मा दिनाचे औचित्य साधून १७ ते २४ जानेवारी २०१५ हा आठवडा सीमा लढा सप्ताह म्हणून घोषित केला. या सप्ताहात महाराष्ट्रातून सीमा लढ्यास बळ मिळावे आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेचा या लढ्यातील सहभाग वाढावा म्हणून स्वाक्षरी मोहीम, सीमा लढ्याशी संबंधित व्यंगचित्र प्रदर्शन आणि स्पर्धा, धरणे आंदोलन, पथनाट्य असे उपक्रम राबवून सीमाप्रश्नाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.महाराष्ट्र एकीकरण समिती मुंबई, मराठी अभ्यास केंद्र आणि बेळगाव बिलाँग्स टू महाराष्ट्र या तीन संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी विद्यार्थी विद्यापीठ भवन, चर्चगेट येथे ‘संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा’ हा सीमा प्रश्नाविषयीचा मेळावा आयोजित केला होता. महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडणाऱ्या, गेली ५८ वर्षे कर्नाटक सरकारचा अत्याचार सहन करणाऱ्या मराठी भाषक बांधवांच्या सीमा लढ्याला पाठिंबा मिळावा हे या मेळाव्याचे प्रयोजन होते. महाराष्ट्र एकीकरण समिती मुंबईचे शंकर पाटील आणि भरमा हराडे यांनी सीमा लढ्याचा इतिहास कथन केला. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी सीमा प्रश्न केवळ तेथील ४० लाख मराठी माणसांचा नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी मुंबई मिळवताना केलेला संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर, भालकी, औराद सीमाप्रदेश महाराष्ट्रात आणल्याशिवाय पूर्ण होणार नाही असे मत व्यक्त केले. बेळगाव बिलाँग्स टू महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष पीयूष हावळ यांनी हा लढा तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, सीमा लढा सप्ताहाच्या पूर्वतयारीसाठी पुढील बैठक १० जानेवारी २०१५ रोजी कोट ग्रामस्थ समाजोत्कर्ष मंडळ, ५५२, चिताई चाळ, सिताराम जाधव मार्ग, लोअर परळ (प.) येथे होणार आहे. (प्रतिनिधी)
सहभाग मिळवण्यासाठी ‘सीमा लढा सप्ताह’
By admin | Updated: December 15, 2014 00:50 IST