नवी मुंबई : महानगरपालिकेने शहरात मार्केटची उभारणी केली आहे. परंतू गाळेवाटपाचे धोरण ठरले नसल्यामुळे त्यांचा वापर होत नाही. मासळी मार्केटचे धोरणही रखडले असून हा प्रश्न कधी सुटणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
महानगरपालिकेने बेलापूर, करावे, नेरूळ, वाशी व इतर काही ठिकाणी मासळी व भाजी मार्केटची उभारणी केली आहे. वाशी व बेलापूरमध्ये पे अँड पार्क तयार केले असून तेथे किऑस्कची निर्मिती केली आहे. बांधकाम पूर्ण होवूनही यामधील एकही मार्केटचा अद्याप वापर करण्यात येत नाही. करावेमध्ये मार्केटचे खंडहर झाले आहे. यासाठी स्थानिक नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी पालकमंत्री गणोश नाईक यांच्याकडेही पाठपुरावा केला आहे. परंतू अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. वाशीमध्ये मासळी मार्केट बांधून काही वर्षे झाली.परंतू ते सुरूच झाले
नाही. सद्यस्थितीमध्ये या
इमारतीमध्ये महानगरपालिकेचे विभाग कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे.
नेरूळमध्येही मार्केटचे बांधकाम पूर्ण झाले आहे. शहरातील मासळी मार्केटमधील जागा वाटपाच्या धोरणाविषयीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे सर्वच नगरसेवकांनी त्यास विरोध केला. त्रुटी सुधारून प्रस्ताव पुन्हा मांडण्याच्या सूचना महापौर सागर नाईक यांनी केल्या आहेत. यामुळे आता गाळे वाटपाचे धोरण कधी ठरणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
उदासीनतेमुळे
प्रश्न रखडला
महापालिका प्रशासन मासळी व भाजी मार्केट उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करीत आहे. मार्केटची उभारणी करून दोन वर्षे झाली तरी त्यांचा वापर होत नाही. वाशीत चक्क मासळी मार्केटचे विभाग कार्यालय करण्यात आले आहे. प्रशासकिय व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हे प्रश्न रखडले असल्याची टीका होऊ लागली आहे.