Join us  

विद्यापीठात आता घ्या दुहेरी पदवीचे शिक्षण, अमेरिकेतील विद्यापीठाशी सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 12:35 PM

Mumbai University News: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी विद्यापीठाने अमेरिकेतील प्रतिष्ठित सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे.

 मुंबई - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी विद्यापीठाने अमेरिकेतील प्रतिष्ठित सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या शैक्षणिक वर्षापासून माहिती तंत्रज्ञान विभागात ‘एम.एस. इन डेटा एनालॅटिक्स’ या अभ्यासक्रमासाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात, तर द्वितीय वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. दुहेरी पदवी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठांची पदवी मिळणार आहे. 

यूएस वाणिज्य दूतावास येथे या करारावर सह्या करण्यात आल्या. यावेळी मुंबई विद्यापीठाकडून कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरु प्राचार्य डॉ. अजय भामरे, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. शिवराम गर्जे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख श्रीवरमंगई आणि सेंट लुईस विद्यापीठाकडून प्रोव्होस्ट मायकेल लेविस, प्रवेश व्यवस्थापन उपाध्यक्ष रॉबर्ट रेड्डी, सहयोगी डीन ट्रॉय हरग्रोव्ह, वरिष्ठ धोरणात्मक सल्लागार सुंदर कुमारसामी, ग्लोबल ग्रॅण्ड इनिशिएटिव्हच्या संचालिका अनुशिका जैन आणि अनन्या कुमार यांच्यासमवेत मुंबईतील यूएस कॉन्सुलेटमधील कमर्शियल कॉन्सुल डेव्हिड पासक्विनी, जनरल सांस्कृतिक आणि शैक्षणिक विभाग प्रमुख सीटा रायटर, सार्वजनिक व्यवहार अधिकारी ब्रेंडा सोया आणि यूएस कमर्शियल सर्व्हिसच्या नोएला माँटेरो या उपस्थित होत्या. या दुहेरी पदवीमुळे प्रत्येक संस्थेच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टता वृद्धीस हातभार लागणार आहे.

होणार काय? विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील डेटा एनालॅटिक्स, डीप लर्निंग, एनएलपी, मशीन लर्निंग, डेटा मायनिंग, डेटा एथिक्स ॲण्ड प्रायव्हसी, बिग डेटा एनालॅटिक्स आणि डेटाबेस मॅनेजमेंट अशा विषयातील अध्ययन, संशोधन पद्धती आणि उपकरणांचा अभ्यास करता येईल. दोन्ही विद्यापीठांतील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधन यांच्या एकत्रित वापरामुळे अध्ययन व संशोधनातील संभाव्य परिणाम साध्य करता येऊ शकतील.  ‘एम.एस. इन डेटा एनालॅटिक्स’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवून पीएच.डीसाठीही सामायिक कार्यक्रम राबविता येईल.

टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षण क्षेत्र