Join us

भारताची फॉर्म्युला रेसिंग कार चालली जर्मनीला

By admin | Updated: July 5, 2014 09:07 IST

के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक ‘ओआरआय २०१४’ ही फॉर्म्युला रेसिंग कार तयार केली आहे

मुंबई : के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक ‘ओआरआय २०१४’ ही फॉर्म्युला रेसिंग कार तयार केली आहे. शुक्रवारी सोमय्या विद्याविहार संकुलात आॅटोमोबाइल उद्योगातील तज्ज्ञांसाठी प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. जर्मनीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय डिझाइन स्पर्धेकरिता (एसएई ) ही कार तयार केली असून, तिला ‘फॉर्म्युला स्टुडंट जर्मनी’ असे संबोधले जणार आहे. इंजिनीअरिंग डिझाइन स्पर्धेतील ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा असून, सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनीअर्स संस्थेतर्फे आयोजित करण्यात येते. आॅटोमोबाइल इंजिनीअरिंग नैपुण्य आणि कौशल्य दाखवण्यासाठी ओआरआय २०१४ जगातील ४४ देशांशी ही भिडणार आहे. अशा प्रकल्पात काम केल्याने आम्हाला केवळ इंजिनीअरिंग शिकण्याच्या दृष्टीनेच फायदा होत नाही, तर सांघिक काम करताना महत्त्वाची असलेली कौशल्ये, प्रकल्प व्यवस्थापन, लॉजिस्टिक, जागतिक निकष लक्षात घेऊन काम करणे आणि इतर संघाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची शिकवण मिळते. दुसऱ्या देशात जाऊन स्पर्धा करणे म्हणजे आमचा उत्साह वाढवणे आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी या वेळी दिली.ही स्पर्धा स्टॅटिक आणि डायनॅमिक अशा दोन प्रकारांत विभागण्यात आली असून, एकूण सात विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात कॉस्ट अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग अ‍ॅनॅलिसीस, बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशन, डिझाइन, अ‍ॅक्सेलेरेशन, स्किड पॅड, आॅटोपॅड, आॅटोक्रॉस, फ्युएल इकोनॉमी आणि एन्ड्युरन्स यांचा समावेश आहे. या स्पर्धांमध्ये अ‍ॅक्सेलरेशन स्पर्धा ४.१ सेकंदांत पूर्ण करणे, एन्ड्युरन्स अ‍ॅण्ड फ्युएल इकोनॉमी स्पर्धेत पहिल्या २५ क्रमांकात स्थान पटकावणे, स्किड पॅड स्पर्धेत सर्वोत्तम १० मध्ये येणे, कॉस्ट अ‍ॅण्ड बिझनेस प्लॅन स्पर्धा जिंकणे, डिझाइनमध्ये पहिल्या २० मध्ये स्थान पटकावणे अशी या विद्यार्थ्यांची उद्दिष्टे आहेत. (प्रतिनिधी)