Join us

जर्मन महिलेचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला अटक

By admin | Updated: August 23, 2015 02:05 IST

अमेरिकन महिलेसमोर एका तरुणाने विकृत कृत्य केल्याची घटना ताजी असतानाच आता एका जर्मन महिलेचा पाठलाग व छेडछाड केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

मुंबई : अमेरिकन महिलेसमोर एका तरुणाने विकृत कृत्य केल्याची घटना ताजी असतानाच आता एका जर्मन महिलेचा पाठलाग व छेडछाड केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साजिद खान (वय २८) असे छेडछाड करणाऱ्या तरुणाचे नाव असून, संबंधित महिलेने सापळा रचून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असलेली ३७ वर्षांची जर्मन महिला पेडर रोड परिसरात राहाते. ती घरातून बाहेर पडल्यानंतर व कार्यालयातून परत येत असताना एक तरुण नेहमी तिच्या मागावर असायचा. सुरुवातीला तिने त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष केले. मात्र ३ महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने तिने त्याला अद्दल घडविण्याचे ठरविले.शुक्रवारी सायंकाळी तो पाठलाग करत तिच्या मागे येत असताना मैत्रिणीच्या मदतीने तिने त्याला अडविले आणि जाब विचारला. शिवाय स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडून मलबार हिल पोलिसांच्या ताब्यातही दिले. अखेर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत गावदेवी पोलिसांनी त्याला अटक केली. खान हा वाहनचालक म्हणून काम करतो. तो व्यसनी असून संबंधित महिलेशी तो संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, असे उपनिरीक्षक मेंढापूरे यांनी सांगितले. दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली. (प्रतिनिधी)