Join us  

क्षयरोगासाठी रामबाण ठरणार जिनोम स्क्विन्सिंग तंत्रज्ञान; आरोग्य मंत्र्यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 2:38 PM

तंत्रज्ञान रुग्णांसाठी उपयुक्त, आरोग्य मंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई : क्षयरोगाचे अचूक निदान व उपचार करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या हेस्टॅक ॲनालिटिक्स या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेले होल जिनोम स्क्विन्सिंग तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

आयआयटी (मुंबई) स्टार्टअप कंपनीच्या वतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून होल जिनोम स्क्विन्सिंग मशीनद्वारे ५०० नागरिकांचे क्षयरोगाचे अचूक निदान व उपचार मोफत करणाऱ्या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, आयआयटी मुंबईचे संशोधक डॉ. अनिर्वाण चॅटर्जी, डॉ. अमृतराज झाडे आदी उपस्थित होते.

या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णाला कुठल्या प्रकारातील क्षयरोग झाला आहे? याचे तातडीने निदान करणे शक्य होते. त्यामुळे या प्रकारातील औषधोपचार करणे डॉक्टरांना सोपे जाणार आहे. क्षयरोगाचे लवकरात लवकर निदान होऊन त्यावर अचूक व वेळेत उपचार झाल्यास रुग्ण क्षयरोगामधून पूर्णपणे बरा होतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पहिला प्रयोग

होल जिनोम स्क्विन्सिंग मशीनद्वारे अचूक निदान व उपचार होणार असल्यामुळे रुग्ण तातडीने बरा होईल. खाजगी रुग्णालयांमध्ये या तपासणीचा दर जास्त असल्यामुळे महापालिका तळागाळातील नागरिकांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविणार आहे. ६ ते ८ महिन्याच्या कालावधीनंतर नियमितपणे अंमलबजावणी होईल, असे महापौरांनी सांगितले. 

‘मुंबई क्षयमुक्त करणे शक्य’ 

क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण त्यासाठी वेळेत चाचणी आणि योग्य उपचार होणे गरजेचे आहे. याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली  तरच क्षयमुक्त राष्ट्र तयार होते. इंग्लंडमध्ये ज्या तपासणीच्या माध्यमातून हे शक्य झाले, तीच अत्याधुनिक तपासणी पद्धत आता मुंबईमध्ये उपलब्ध झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :राजेश टोपेमुंबई