जव्हार : राष्ट्रवादीतील १० बंडखोरांच्या गटाला जिल्ह्याधिकाऱ्यांनी मान्यता देवून अविश्वासावर चर्चा करण्यासाठी २९ डिसेंबरला पालिकेची सभा बोलावल्याने नगराध्यक्ष आपणहून राजीनामा देतात की, अविश्वास मंजूर होऊन पदच्युत होण्यात धन्यता मानतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सहा दिवसांपूर्वी जव्हार नगर परिषदेच्या सत्ताधारी १० नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावत पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे जव्हार विकास आघाडी हा स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करून गटाला मान्यता देण्याचा विनंती अर्ज सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली आहे. रवींद्र चावरे यांची गटनेतेपदी निवड केल्याचे या गटाने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर १० नगरसेवकांनी २० तारखेला झालेल्या न.प. सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्याबाबतचा पक्षाचा व्हीप धुडकावल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याबाबत राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केला होता. त्याला आता स्वल्पविराम मिळाला आहे. त्यामुळे आता २९ डिसेंबरला काय घडते याकडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे.
जव्हार नगराध्यक्ष अविश्वासाची सर्वसाधारण सभा २९ डिसेंबरला
By admin | Updated: December 24, 2014 22:44 IST