ठाणे : नगरसेवकांना स्मार्ट करण्याकरिता त्यांना टॅब दिले. परंतु त्यावर महापालिका कुठलीच माहिती पाठवत नसल्याने ते धूळ खात पडून असल्याची तक्रार बहुतांश नगरसेवकांनी महासभेत केल्यावर आता पुढील महासभेचा अजेंडा टॅबवर देण्याची घोषणा सचिव विभागाने केली आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आपल्या टॅबवरील धूळ झटकून त्यावर कधी अजेंडा पडतो याची वाट पाहणे सुरू केले आहे.मात्र महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासंबंधी माहिती नगरसेवकांच्या टॅबवर उपलब्ध झाली नसताना, सचिव विभागाचा सुरू असलेला संथ कारभार पाहता, हा निर्णय धाडसी ठरून अजेंडा ना टॅबवर ना प्रत्यक्ष हातात अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती नगरसेवक व्यक्त करीत आहेत.मागील सर्वसाधारण सभेत ठाणे महापालिका आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्या परिपत्रकानुसार सरसकट सर्व विभागाच्या फाईल सर्वांनाच उपलब्ध करून देण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. एखाद्या विषयावर चर्चा करताना त्याची फाईल बघण्यास मिळत नसेल तर आम्ही डोळे झाकून विषय मंजूर करायचे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी या परिपत्रकावर आक्षेप घेतला होता. मात्र त्या वेळी शहर विभागासह इतर विभागाच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठीच अशा प्रकारचे परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली होती. नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. सचिव विभागातून नगरसेवकांना हवी असलेली फाईल ते पाहू शकतात, असेही स्पष्ट केले होते. त्या वेळी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेचा अजेंडा किमान तीन ते सात दिवस आधी मिळण्याची मागणी केली होती. काही वेळा सचिव विभाग सभेच्या आदल्या रात्री अजेंडा पाठवित असल्याने विषयांचा अभ्यास करता येत नसल्याची बाब समोर आणण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत असताना नगरसेवकांना सभेची माहिती आणि विषयांची माहिती वेळेवर मिळत नसल्याची तक्रार होती. नगरसेवकांना टॅब उपलब्ध करून देण्यात आले असले तरी त्यावर माहितीच पाठविण्यात येत नसल्याचे गाऱ्हाणे आयुक्तांच्या कानावर घालण्यात आले. त्यानंतर एका महिन्यात नगरसेवकांना माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. महापालिकेचे सचिव मनीष जोशी यांनी पुढील महासभेचा अंजेडा टॅबवर उपलब्ध करून देण्याला दुजोरा दिला आहे. त्यानुसार प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून, नगरसेवकांना पुढील सभेपासून महापालिका संबंधित पुढील विषयांची माहिती टॅबवर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटीबरोबर नगरसेवकांनीही स्मार्ट बनविण्यासाठी, पालिका प्रशासनाने नगरसेवकांच्या हाती टॅब दिले. परंतु मागील सहा महिन्यांपासून हे टॅब धूळ खात पडले होते. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढील सभेपासून नगरसेवकांना टॅबवर माहिती मिळवून देण्याचे आश्वासन नगरसेवकांना दिले होते. - नगरसेवकांना टॅब उपलब्ध करून देण्यात आले असले तरी त्यावर माहितीच पाठविण्यात येत नसल्याचे गाऱ्हाणे आयुक्तांच्या कानावर घालण्यात आले. पालिकेचे सचिव मनीष जोशी यांनी पुढील महासभेचा अजेंडा टॅबवर उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार नगरसेवकांना पुढील सभेपासून महापालिकासंबंधित विषयांची माहिती टॅबवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महासभेचा अजेंडा टॅबवर मिळणार
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST