Join us  

अदानी करणार धारावीचा पुनर्विकास! ५ हजार कोटींची बोली लावली, DLF शर्यतीतून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 8:00 PM

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली मुंबईतील धारावी  झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम गौतम अदानी यांच्या कंपनीकडून पूर्ण केले जाणार आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली मुंबईतीलधारावी  झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम गौतम अदानी यांच्या कंपनीकडून पूर्ण केले जाणार आहे. सर्व कंपन्यांना मागे टाकत अदानी समूहाच्या अदानी रिअल्टी या कंपनीने धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकास प्रकल्पाची बोली जिंकली आहे.

महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी प्राप्त झालेल्या निविदा मंगळवारी, 29 नोव्हेंबर रोजी उघडल्या. प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी नमन समूहाची एक बोली बोलीमध्ये पात्र ठरू शकली नाही. यानंतर अदानी रियल्टी आणि डीएलएफ यांच्या बोली उघडण्यात आल्या. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने या प्रकल्पासाठी डीएलएफच्या बोलीपेक्षा दुप्पट बोली लावली होती. अदानी समुहाची बोली 5,069 कोटी रुपये होती, तर धारावी पुनर्विकासासाठी डीएलएफची बोली 2,025 कोटी रुपये होती. विशेष म्हणजे धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम 17 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

अंबानी-अदानींना सर्वांनाच माहितीयेत, देशातील इतर अब्जाधीश कोण आहेत? जाणून घ्या त्यांचा व्यवसाय

मुंबई धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या आराखड्यानुसार एका कंपनीसोबत करार करून झोपडपट्टी परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे या भागातील झोपडपट्टीवासीयांना फायदा होईल. 

मुंबईचा विकास करण्याच्या दिशेने सरकार हे मोठे पाऊल उचलत आहे. या प्रकल्पांतर्गत धारावीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या पात्र लोकांना मोफत घरे मिळू शकणार आहेत. जे आवश्यक सुविधांनी सुसज्ज असेल. प्रारंभ प्रमाणपत्र दिल्यानंतर पहिल्या टप्प्याचे काम 7 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. अहवालानुसार, धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुमारे 56,000 लोकांना स्थायिक करण्याची तयारी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 20,000 कोटींहून अधिक आहे. सन 2019 मध्येही सरकारने धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी जागतिक निविदा काढली होती. मात्र नंतर विविध कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले.

ऑक्टोबर महिन्यात पुन्हा निविदा काढण्यात आली. यावेळी तीन परदेशी कंपन्यांसह एकूण 8 कंपन्यांनी या प्रकल्पात रस दाखवला होता, मात्र केवळ तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. यामध्ये अदानी रियल्टी आणि डीएलएफ व्यतिरिक्त नमन ग्रुपचा समावेश होता.

फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती 134.4 अब्ज डॉलर आहे. यासोबतच फोर्ब्सने नुकत्याच जाहीर झालेल्या रिच लिस्ट इंडिया-2022 मध्ये गौतम अदानी पहिल्या स्थानावर कायम आहेत.

टॅग्स :गौतम अदानीमुंबईधारावी