मुंबई : लाडक्या बाप्पाच्या मागोमाग शनिवारी सर्वत्र गौरींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. महिलांनी वाजतगाजत मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या माहेरवाशिणीला घरी आणले. गणेशभक्तांनी गौराईला मोठ्या मानाने गणपतीच्या बाजूला स्थान दिले.गौरींमध्ये उभ्या गौरी, धातूच्या गौरी, तेरड्याच्या गौरी असे विविध प्रकारही आढळतात. भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते, म्हणून याला ‘ज्येष्ठा गौरी’ म्हटले जाते. तर काही ठिकाणी केवळ नदी, वहाळातील पाच किंवा सात खडे आणून गौरीपूजन केले जाते.गौरींचे आगमन झाले की घरात चैतन्य निर्माण होतं. गौरीच्या रूपाने लेकी माहेरी येतात अशी धारणा असते. आज गौरींचं आगमन होतं, दुसऱ्या दिवशी त्या मिष्ठान्न भोजन घेतात आणि तिसऱ्या दिवशी त्या पुन्हा जायला निघतात, अशी श्रद्धा आहे. गौरी हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यांची यथासांग पूजा करून पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण केला जातो. घराघरात स्थानापन्न होणाऱ्या गौरींचे प्रकार मात्र वेगवेगळे असतात. अनेक ठिकाणी गौरीचा मुखवटा सजवून पूजा करण्यात येते. काही ठिकाणी मांस-मटणाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धतही आहे. या गौरींचे आगमन पूर्वा नक्षत्र असताना होते, त्या वर्षी गौरींचे हौसे साजरे केले जातात. (प्रतिनिधी)
गौराई आली माझिया घरा...
By admin | Updated: September 20, 2015 00:30 IST