Join us  

जे जे रुग्णालयात गॅस सप्लाय 'डिजिटल' होणार; साडे तेरा कोटी रुपयास मंजुरी

By संतोष आंधळे | Published: January 03, 2024 7:53 PM

रुग्णालयातील गॅस प्लांट हा महत्वाचा घटक आहे.

मुंबई: राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या जे जे रुग्णलायत रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या सेंट्रलाइज वैद्यकीय गॅस प्लांटचे नूतनीकरण करण्याचा रुग्णालय प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पूर्वीची जुनाट गॅस पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने १३ कोटी ६७ लाख रुपयाच्या खर्चास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता जे जे रुग्णालयाचा गॅस सप्लाय अत्याधुनिक स्वरूपात ' डिजिटल ' पद्धतीने होणार आहे.

रुग्णालयातील गॅस प्लांट हा महत्वाचा घटक आहे. त्यामधून सेंट्रलाइज पद्धतीने रुग्णलयातील ऑपरेशन थिएटर, अति दक्षता विभाग आणि वॉर्ड मधील रुग्णांना वैद्यकीय गॅस पुरविला जातो. यामध्ये सर्व रुग्णांसाठी लागणार प्राणवायू ( ऑक्सिजन ), व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांसाठी  नॉर्मल (कंप्रेस एअर ) एअर आणि अनेस्थेशियासाठी नायट्रस गॅस या  सेंट्रलाइज पद्धतीने पुरविला जातो. गेल्या काही वर्षात खासगी रुग्णालयात गॅस सप्लायचे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर आता जे जे रुग्णलयात गॅस सप्लायचे काम करण्यात येणार आहे.

सध्याच्या घडीला रुग्णलायतील प्रत्येक माळ्यावर गॅस गळती किंवा काही बिघाड झाल्यास नियंत्रण करण्यासाठी पूर्ण माळ्यावरचा गॅस बंद करावा लागत असे. मात्र नवीन पद्धतीने करण्यात येणाऱ्या रचनेत प्रत्येक विभागाचा, वॉर्डचा सप्लाय हा वेगळा असणार आहे. कुठे काही बिघाड झाल्यास डिजिटल यंत्राद्वारे तात्काळ त्याची माहिती होणार आहे. तसेच त्या एका विभाग पुरता गॅसचा सप्लाय बंद करणे शक्य होणार आहे. सर्व व्यवस्था ही डिजिटल पद्धतीने हाताळण्यात येणार आहे.

जे जे रुग्णलयात एकूण १३५२ बेड्स असून प्रत्येक बेडला ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल अशी व्यवस्था आहे. तसेच ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभागात सुद्धा ही अत्याधुनिक व्यवस्था कार्यान्वित होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :मुंबईजे. जे. रुग्णालय