Join us

चेंबूरमध्ये गॅस पाइपलाइन फुटली

By admin | Updated: February 9, 2015 02:06 IST

चेंबूर येथे रस्त्याचे काम सुरू असताना रविवारी अचानक एलीपीजी गॅस पाइपलाइन फुटली. त्यामुळे सायन-पनवेल महामार्ग एक तासासाठी बंद करण्यात आला

मुंबई : चेंबूर येथे रस्त्याचे काम सुरू असताना रविवारी अचानक एलीपीजी गॅस पाइपलाइन फुटली. त्यामुळे सायन-पनवेल महामार्ग एक तासासाठी बंद करण्यात आला होता. अग्निशमन दलाने तत्काळ येथे धाव घेत ही गॅसलाइन बंद केल्याने मोठी हानी टळली. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे येथे गॅस पाइपलाइन फुटली होती. तेव्हाही येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली होती. गेल्या काही दिवसांपासून चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. रविवारी सायन-पनवेल मार्गावरील सुमननगर परिसरात जेसीबी मशिनद्वारे खोदकाम सुरू होते. हे काम सुरू असताना सायंकाळी ५च्या सुमारास जमिनीखालून जाणाऱ्या गॅस पाइपलाइनवर याचा अचानक प्रहार झाला. याने या पाइपलाइनला तडा गेला व काही वेळातच गॅस परिसरात पसरला. ही बाब याच परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावरील काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि गॅस कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा येथे मोठ्या प्रमाणावर गॅस बाहेर पडत असल्याचे या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. कोणतीही हानी होऊ नये यासाठी सायन-पनवेल महामार्ग तत्काळ बंद करण्यात आला. गॅसचा प्रवाह बंद केल्यानंतर तासाभरात हा मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला.