Join us

शहाडमध्ये कचराकोंडी

By admin | Updated: July 7, 2015 00:34 IST

आठवडाभरापासून शहाड आणि परिसरातील कचरा उचलण्यात न आल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.

शहाड : आठवडाभरापासून शहाड आणि परिसरातील कचरा उचलण्यात न आल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. येथे सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांवर सर्वत्र मातीचे ढीग पडले आहेत. त्यामुळे दलदल निर्माण झाली असून सध्या पावसाळा असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील शहाड आणि परिसरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांचे बांधकाम, पदपथांच्या सुशोभीकरणाचे आणि ज्या मोहना रोडचे काँक्रिटीकरण झाले आहे, त्या रस्त्याला जोडून पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ही कामे बंद आहेत. कामे अर्धवट असल्यामुळे जागोजागी, रस्त्यांवर पेव्हरब्लॉक, फरशा, वाळूचे आणि मातीचे ढिगारे, फायबरचे दुभाजक पडलेले आहेत. शहाड गाव ते बंदरपाडा या भागात दगड, माती व कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले आहेत. सध्या पावसामुळे ही माती रस्त्यावर वाहून आली आहे. मोहना रोडवर रहदारी असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.या भागात गेल्या दोन महिन्यांपासून महानगर गॅस लि. कंपनीचे भूमिगत गॅस वाहिन्या टाकण्याचे काम सुरू होते. ते आता पूर्ण झाले असले तरी त्यासाठी खोदलेले खड्डे योग्य प्रकारे न बुजविल्याने व खड्ड्यात टाकलेल्या मातीमुळे मोठी दलदल निर्माण झाली आहे. याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील तिरुपती आशिष गृहसंकुल आणि उड्डाणपुलाखाली जमा होणारा कचरा आठवडाभरापासून न उचलल्याने तो आता रस्त्यावर आला आहे. (वार्ताहर)