Join us  

सौंदर्यीकरण? छे! अंधेरी-कुर्ला  रोडचे विद्रुपीकरण अन् ‘कचरा’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:28 PM

शहराच्या सौंदर्यीकरणाचा महत्त्वाचा प्रकल्प पालिकेकडून पार पाडला जात आहे.

मुंबई : शहराच्या सौंदर्यीकरणाचा महत्त्वाचा प्रकल्प  पालिकेकडून पार पाडला जात आहे. मात्र, नियोजनाअभावी याला बांधा पोहोचत आहे. विविध ठिकाणच्या दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये शहर, पश्चिम व पूर्व उपनगरातील दुभाजकांचा समावेश असून यामधील मोकळ्या जागेत फुलझाडांची लागवड करणे, बोधचिन्हे, सिग्नल यांचा कलात्मकरीत्या सजावट करणे अशी कामे अपेक्षित होती. मात्र के पूर्व वॉर्डातील अंधेरी कुर्ला रस्त्यावरील दुभाजकांची स्थिती पाहिल्यास  सुशोभीकरणावरच प्रश्न उपस्थित होत आहे. 

पालिकेकडून सौंदर्यीकरणावर तब्बल १७०० कोटी खर्च करून त्याची सुरक्षितता, सुशोभीकरण केले जाणार नसेल तर उपयोग काय, असा प्रश्न वॉचडॉग फाउंडेशनकडून उपस्थित करण्यात आला आहे. 

नियोजनाअभावी सौंदर्यीकरणात बाधा:  पालिकेच्या नियोजनाअभावी अंधेरीच्या लोखंडवाला भागासह अनेक ठिकाणांची हीच परिस्थिती आहे. सौंदर्यीकरणातील कामांचा रंग उडाला आहे.   अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा लावलेले दिवे बंद आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे.   सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण असून, पैशाचा अपव्यव आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ याची दखल घेण्याची मागणी वॉचडॉग फाउंडेशनकडून गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.

१६ विविध प्रकारची कामे:  प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभीत हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे केली जाणार आहेत.   १६ विविध प्रकारची कामे या सुशोभीकरणांतर्गत केली जाणार आहेत. त्यात वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, दुभाजकांचे सुशोभीकरण यांचा समावेश आहे. 

फेरीवाले, गर्दुल्ले यांच्यामुळे दुभाजकांची दुर्दशा: अंधेरी कुर्ला रोड परिसरातील दुभाजकांचा विचार केला असता त्या परिसरातील फेरीवाले, गर्दुल्ले यांच्यामुळे दुभाजकांची दुर्दशा होत आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलनाची वाहने या दुभाजकांजवळ असूनही तिथे फेरीवाले आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून दुभाजकांमध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर कारवाई करत होत नाही, अशी टीका करण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईनागरी समस्या