मुंबई : देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याला मुंबई महापालिकेची रुग्णालये अपवाद कशी असतील? परळ येथील केईएम रुग्णालयातही स्वच्छता अभियान राबविले जात आहे. पण रुग्णालयाच्या गेट क्रमांक ८ च्या बाजूलाच गेल्या १५ दिवसांहून अधिक काळ भंगार सामान आणि कचरा पसरलेला आहे, याकडे मात्र रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे पुन्हा एकदा केईएममध्ये डासांची उत्पत्ती होण्याचा धोका वाढला आहे. केईएम रुग्णालयात शवविच्छेदन केंद्राच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाइकांना बसण्यासाठी असलेल्या जागेच्या बाजूला हा ढीग साचलेला आहे. तुटलेल्या खुर्च्या, रॅक, टेबल, पाण्याच्या टाक्या पडून आहेत. त्यातच प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, औषधांची आवरणे आणि तुटलेले स्ट्रेचरदेखील येथे टाकण्यात आले आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांना बसण्याची सोय असली, तरी त्या बाजूला कोणीच बसत नाही. दुसऱ्या बाजूला गर्दी झाल्यास नातेवाइकांना उभे राहावे लागत आहे. इतके दिवस भंगार सामान पडून राहिल्याने डासांची उत्पत्ती होण्याचा धोका आहे. असे झाल्यास पुन्हा केईएम रुग्णालयात मलेरिया अथवा डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका असल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केईएम रुग्णालयात पावसाळ्यात दुरुस्तीचे काम सुरू होते. या वेळी काही ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास झाली होती. रुग्णालयाने स्वच्छता मोहीम हाती घेतल्याने रुग्णालयातील सर्व विभाग भंगार सामान काढत आहेत. रुग्णालयात भंगार सामान ठेवू शकत नसल्यामुळे ती जागा रुग्णालय प्रशासनाने नेमून दिली. त्या गेटने भंगार सामान बाहेर काढणे सोपे जाते. पण, गेल्या आठ दिवसांपासून कॉन्ट्रॅक्टर न आल्याने ते भंगार सामान तिथेच पडून आहे. आम्ही त्याला संपर्क केला आहे, असे केईएम रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)