मुंबई : गाव तेथे एसटी, एसटीचा प्रवास-सुखकर प्रवास म्हणत, ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रिद घेऊन जनतेच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाने १ डिसेंबरपासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. मात्र, एसटी स्थानके पाहिल्यास स्वच्छता अभियान नावालाच असून,‘ बस स्थानके नव्हे कचराकुंड्या’ अशी स्थिती आहे.
1 कुर्ला एसटी बस स्थानक
कुर्ला येथील एसटी बस स्थानकात प्रवाशांची गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानकातील गर्दी कमी झाली आहे. स्थानकात एकीकडे स्वच्छता सुरू असल्याचे दिसते. कर्मचारी प्रवाशांनी टाकलेले, वेफर्स, बिस्कीटची रिकामे पॅकेट उचलत आहेत. मात्र, या सर्व कचऱ्याचा स्थानकातील शौचालयासमोर ढीग करण्यात आला आहे.
2 मुंबई सेंट्रल एसटी बस स्थानक
एसटीने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. मात्र, भिंतीवरील पिचकाऱ्या थांबलेल्या दिसत नाहीत. मुंबई सेंट्रल एसटी बस स्थानकात काही ठिकाणी या पिचकाऱ्या पाहायला मिळतात, तर दुसरीकडे प्रवाशांचेही स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. प्रतीक्षालयात खाद्यपदार्थाच्या पिशव्या, पाण्याची बाटली टाकून देतात.
3 नॅन्सी बस स्थानक
एसटी महामंडळाने स्वच्छता मोहीम सुरू करून आठवडा उलटला आहे. मात्र, नॅन्सी एसटी बस स्थानकात स्वच्छता मोहिमेची सुरुवात झालीच नाही, असे चित्र आहे.प्लास्टीकच्या पिशव्या आणि इतर कचरा विखुरलेला आहे. काही ठिकाणी तर दारूच्या बाटल्याही दिसतात, तसेच प्रवाशांना बसायला व्यवस्था चांगली नाही. अनेक बाकांचे सिमेंट निघाले आहे.