Join us

गँगस्टर पांडेची हत्या

By admin | Updated: June 8, 2015 03:20 IST

कुमार पिल्ले टोळीचा गँगस्टर अनील रामसेवक पांडे याची भांडुपमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली.

मुंबई : कुमार पिल्ले टोळीचा गँगस्टर अनील रामसेवक पांडे याची भांडुपमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. पांडेच्या जाचाला कंटाळून भांडुप टेंभीपाडा, राम नगरच्या रहिवाशांनी हे पाऊल उचललल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घराचे पत्रे बाजुला सारून आत शिरलेल्या १५ ते २० जणांच्या जमावाने पाण्डेची खांडोळी केल्याची माहिती पोलीसांनी दिली. पांडेच्या हत्येची माहिती मिळताच भांडुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गँगवॉरमधून पाण्डेची हत्या करण्यात आल्याचा संशय सुरूवातीला पोलिसांना होता. मात्र चौकशीत भलतेच वास्तव समोर आले. शनिवारी रात्री पाण्डेने दारूच्या नशेत येथील एका मंदिराच्या दरवाजावर लाथा मारल्या. मंदिरातील बल्ब फोडले. घंटा खाली खेचून त्याच्या चेनने समोर येईल त्याला मारत सुटला. हा प्रकार पाहून परिसरातील काही महिला मध्ये पडल्या. पांडेने या महिलांनाही मारले. त्यानंतर याच परिसरातील सौरभ खोपडे व अन्य एका तरूणाला त्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले, अशी माहित समोर आली.मुळात पांडेला मोठी गुन्हेगारी पार्श्वभुमी आहे. पिल्लेच्या इशाऱ्यावरून पांडेने खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे केले. त्याच्याविरोधात मोक्कान्वयेही कारवाई झाली. त्याला तडीपारही करण्यात आले होते. मात्र तो पुन्हा भांडुपमध्ये वास्तव्यास आला. आल्यावर त्याने परिसरातील छोटया मोठया बांधकाम व्यावसायिकांकडून खंउणी उकळण्यास, खंडणीसाठी धमकावण्यास सुरूवातकेली. तसेच भांडुपमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने मारहाण, धमक्यांद्वारे दहशत पसरवली होती. कालचा प्रकाराने इथल्या स्थानिक रहिवाशांचा संताप अनावर झाला. ते एकत्र आले आणि मध्यरात्री पाण्डे दारूच्या नशेत असताना जमावाने पत्रे बाजुला करून त्याच्या घरात प्रवेश केला. सुमारे १५ ते २० जणांनी त्याच्यावर तलवार, चॉपरने असंख्य वार केले आणि पसार झाले.गुन्हयात सहभाग असल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनीटने समीर विठोबा कदम(२८), रवी वानरे(२२), गौतम साहेबराव घाडगे(२५) आणि सागर विठठल गवस(२६) या चौघांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी या चौघांना भांडुप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उद्या पोलीस त्यांना न्यायालयात हजर करणार आहेत. त्यांच्या चौकशीतून पांडेच्या हत्येत सहभागी असलेल्या शिवम भोगले, सौरव खोपडे आणि अन्य दहा ते बारा जणांची नावे उघड झाल्याची माहिती मिळते.