Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीवर बलात्कार करणारा गजाआड

By admin | Updated: August 21, 2015 02:02 IST

रात्रीच्या सुमारास एकटी घरी चाललेल्या ७ वर्षीय चिमुरडीला वडिलांशी भेट घालून देतो, असे सांगून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना धारावीत घडली

मुंबई : रात्रीच्या सुमारास एकटी घरी चाललेल्या ७ वर्षीय चिमुरडीला वडिलांशी भेट घालून देतो, असे सांगून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना धारावीत घडली. या प्रकरणी आरोपी नराधम नसीम शेख (२५) याला बुधवारी धारावी पोलिसांनी अटक केली.धारावी परिसरात ७ वर्षीय सोनू (नाव बदललेले आहे) आईवडिलांसोबत राहते. आईवडील दोघेही मजुरीचे काम करतात. त्याच परिसरात सोनूचे मामा राहण्यास आहेत. १५ आॅगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास मामांकडून पैसे आणण्यासाठी सोनूला मामाच्या घरी पाठविण्यात आले होते. मात्र पैसे घेऊन येतो, असे सांगून मामाने तिला घरी जाण्यास सांगितले. तेव्हा घरी जाताना सोनूच्या मागावर असलेल्या शेख याने तिला वडिलांशी भेट घालून देतो, असे सांगितले आणि सोनूचे अपहरण करून निर्जनस्थळी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता करू नये, म्हणून धमकावून, मारहाण करून चिमुरडीला घरी पाठविले. बराच वेळ सोनूचा थांगपत्ता लागत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा सोनू रडत येताना दिसली. तिच्याकडे विचारणा केली असता, तिने आरोपीच्या कृत्याबाबत सांगितले.या प्रकरणी सोनूच्या कुटुंबीयांनी तत्काळ धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात अपहरण, बलात्कार आणि पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. विभागातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीचा माग घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार बुधवारी धारावी परिसरातून नसीमच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले. आरोपीला पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)