Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकच्या पुलाचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:34 IST

नवी मुंबई : शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकच्या पुलाचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त ...

नवी मुंबई : शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकच्या पुलाचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुलाच्या कामासाठी वापरले जाणारे महागडे ॲल्युमिनियम व कॉपरच्या केबल त्यांनी चोरी केल्या होत्या.

पनवेल व उरण परिसरात सुरू असलेल्या शासकीय कामांच्या ठिकाणावरून साहित्य चोरीच्या घटना घडत होत्या. त्यात शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक, रेल्वे पूल आदी कामांचा समावेश होता. सी-लिंकचे बांधकाम दर्जेदार व्हावे, यासाठी लोखंडाऐवजी ॲल्युमिनियमच्या सळ्या वापरल्या जात आहेत. त्यानुसार, हे महागडे ॲल्युमिनियम, कॉपर केबल, सेंटरिंग प्लेट असे साहित्य चिर्ले येथील गोडाऊनमध्ये साठविण्यात आले आहे. त्या ठिकाणी पाळत ठेवून मागील बाजूच्या दलदलीच्या भागातून जाऊन हे तिथले साहित्य चोरी करायचे. त्यानंतर, चोरलेल्या साहित्याची भंगारात विक्री करायचे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने तपासाला सुरुवात केली.

यादरम्यान, पोलीस नाईक किरण राऊत व पोलीस शिपाई मेघनाथ पाटील यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक बनविण्यात आले. या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून ९ जणांच्या टोळीला अटक केली आहे. विनोद गौतम, रमेश यादव, भगवानदास कोरी, सचिन टेंभुर्णे, अब्दुल खान, मोहम्मद खान, आसिफ चौधरी, मैनुद्दीन खान, नेपाळी खान अशी त्यांची नावे आहेत.

सर्व जण मुंबईसह नवी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहेत. त्यांनी यापूर्वीही वेगवेगळ्या महामार्गांच्या कामाचे, रेल्वे पुलाचे साहित्य चोरल्याचे समोर आले आहे. अशा सात गुन्ह्यांची उकल झाली असून, १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.