Join us  

गणेशोत्सव : एक नगरसेवक, एक कृत्रिम तलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 1:47 PM

गणेशोत्सवाचे पडघम आता वेगाने वाजू लागले आहेत.

मुंबई : मुंबापुरीतल्या गणेशोत्सवाचे पडघम आता वेगाने वाजू लागले आहेत. सणांचा राजा असलेल्या श्रावण महिन्याने मुंबईला उत्सवाचा साज चढला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव भान राखून साजरे करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशात्सवादरम्यान अधिकाधिक गणेश मूर्ती या कृत्रिम तलावांत विसर्जित करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई महापालिकेने यासाठी वॉर्ड स्तरावर काम हाती घेतले आहे. प्रत्येक वॉर्डातील प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात एक कृत्रिम तलावाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. २४ वॉर्डनिहाय आणि २२७ प्रभाग निहाय नगरसेवकांचा जरी विचार केला तरी मुबई महापालिकेने आपले लक्ष्य पुर्ण केल्यास मुंबईत सरासरी २०० हून अधिक कृत्रिम तलावांचा निर्मिती होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात काही ठिकाणी एक प्रभाग, एक गणपती अशी कल्पना राबविली जाणार आहे. मुंबई महापालिकेनेच यात पुढाकार घेतला आहे. पश्चिम उपनगराप्रमाणे पूर्व उपनगरात आणि शहरात ही कल्पना राबविता येईल का? याचाही काही मंडळी विचार करत आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास आपण नक्कीच कोरोनाचा संसर्ग थांबवू शकू. शिवाय कोरोनावर विजय प्राप्त करू शकू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आता गणेशोत्सव अधिकाधिक आरोग्यत्सव कसा होईल? यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून भर दिला जात आहे. दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यासाठी कामही सुरु केले असून, उर्वरित मंडळेदेखील त्यांचा कित्ता गिरवतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशोत्‍सव-२०२० संदर्भात सर्वसमावेशक सुधारित मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कोविड-१९ या साथ रोगाच्‍या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा श्री गणेशोत्‍सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन महानगरपालिका व शासनस्‍तरावरुन वेळोवेळी नागरिकांना करण्‍यात आले आहे.  काही अधिकच्‍या सुचनांचा समावेश करुन महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी काही सुधारित मार्गदर्शक सूचना देण्‍यात आल्या आहेत.  ---------------------------

  • सार्वजनिक गणेशोत्‍सवासाठी गणेशोत्‍सव मंडळांना महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहील.
  • मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारावेत.
  • घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्‍यात भपकेबाजी नसावी.
  • श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फूटांपेक्षा जास्‍त उंचीचे नसावेत.
  • आरोग्‍य विषयक व सामाजिक संदेश असलेल्‍या जाहिरातींना पसंती द्यावी.
  • आरती, भजन, कीर्तन वा अन्‍य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्‍यावी.
  • ध्‍वनि‍ प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करावे.
  • श्रीगणेशाच्‍या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व समाज माध्‍यमे आदींद्वारे, उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत जास्‍तीत-जास्‍त व्‍यवस्‍था करावी.
  • गणपती मंडपांमध्‍ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्‍क्रीनिंगची पर्याप्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.
  • विविध गणेशोत्‍सव मंडळे, गृहनिर्माण संस्‍था, लोकप्रतिनिधी, स्‍वयंसेवी संस्‍था इत्‍यादींच्‍या मदतीने कृत्रि‍म तलावांची निर्मिती करण्‍यात यावी.
  • कृत्रिम तलावांची निर्मिती करण्‍याबाबत मागणी आल्‍यास, काही जुजबी पडताळणी करुन त्‍यास त्‍वरित मान्‍यता द्यावी.
  • गणेशोत्‍सव विसर्जनाच्‍या तारखेस जर सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्‍ये असेल तर त्‍या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळास मंडपातच मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्‍त कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत याची खबरदारी घ्‍यावी.
  • मंडपाच्‍या मुख्‍य भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे.
  • भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक, समाज माध्‍यमें इत्यादीद्वारे सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
टॅग्स :गणेशोत्सवमुंबईमुंबई महानगरपालिका