Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणेश नाईकांचा पुन्हा सिडको हटावचा नारा

By admin | Updated: May 6, 2015 00:40 IST

क्लस्टर आणि अडीच चटईक्षेत्रावरून महाराष्ट्र सरकार, सिडको आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष अजूनही मिटलेला नाही.

नवी मुंबई : क्लस्टर आणि अडीच चटईक्षेत्रावरून महाराष्ट्र सरकार, सिडको आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष अजूनही मिटलेला नाही. महापालिका निवडणूक प्रचारात आम्हाला सिडको नकोच, असे सांगणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी मंगळवारी सकाळी १० वाजता पुन्हा वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात सिडकोविरोधात बिगुल वाजविला. नवी मुंबईतील गावठाणातील सुमारे ८०० इमारती तोडण्याच्या नोटिसा त्यांच्या मालकांना सिडकोने पाठविल्या आहेत. या इमारती उभ्या राहण्यास सिडकोचे अधिकारी जबाबदार असून सात-आठ माळ्यांच्या इमारती उभ्या राहीपर्यंत आणि त्यांना वीज-पाणीपुरवठा होईपर्यंत हे अधिकारी झोपले होते का? असा सवाल करून आता त्याठिकाणी गोरगरीब जनता राहण्यास आल्यानंतर त्या तोडण्याची सिडकोची भाषा अमानवी आहे. कोणत्याही परिस्थितीत या इमारती तोडू देणार नाही, त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू, असा पवित्रा घेऊन नाईक यांनी सिडको हटावचा नारा दिला. सरकारने जाहीर केलेले क्लस्टर आणि अडीच चटईक्षेत्राचे धोरण बिल्डरधार्जिणे आहे. त्याला राष्ट्रवादीचा तीव्र विरोध आहे. सरकारचे निर्णय प्रकल्पग्रस्तांसह नवी मुंबईकरांना नुकसानदायक असल्याचे ते म्हणाले. यावेळी महापौर सागर नाईक, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते. (खास प्रतिनिधी)