नवी मुंबई : मागील दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पक्षांतराच्या कथित चर्चेला माजी मंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी पूर्णविराम दिला. आपण राष्ट्रवादीतच असून, याच पक्षाच्या माध्यमातून महापालिकेच्या आगामी निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विधानसभा निवडणुकीतील निसटत्या पराभवानंतर नाईक राष्ट्रवादी सोडून भाजपा किंवा शिवसेनेत प्रवेश करणार अशा वावड्या उठत होत्या. यासंदर्भात नाईक यांनी मौन बाळगल्याने ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नाईक यांनी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली होती. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या खोलात जाण्याची ही वेळ नाही. या निवडणुकीत ४३ प्रभागांत राष्ट्रवादीला आघाडी मिळाली होती. तर १५ ते २० प्रभागांत ५०-१०० मतांची पिछाडी होती. महापालिका निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून उमेदवारांची निवड केली जाईल. त्यामुळे आपसातील मतभेद बाजूला ठेवा. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. तसेच ज्यांना माझी मते पटत नाहीत, त्यांनी खुशाल अन्य पक्षांत जावे, असेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. यावेळी आमदार नरेंद्र पाटील, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे, माजी खासदार संजीव नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गणेश नाईक राष्ट्रवादीतच
By admin | Updated: February 24, 2015 04:44 IST